सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 06:18 PM2024-06-02T18:18:15+5:302024-06-02T18:27:18+5:30

Sikkim Assembly Election : सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे.

SKM returns to power in Sikkim with a thumping majority winning 31 out of 32 seats | सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

Sikkim Assembly Election Result 2024: रविवारी झालेल्या मतमोजणीत अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल हाती आले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र सिक्कीममध्ये भाजपला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवून सिक्कीममध्ये पुन्हा सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने विधानसभेत ३२ पैकी ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपाला सिक्कीममध्ये एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही.

सिक्कीममध्ये प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात मुख्य लढत होती. सिक्कीममध्ये भाजप आणि काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले होते. १४६ उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, कृष्णा कुमारी राय, माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, माजी भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि भाजपचे नरेंद्र कुमार सुब्बा या प्रमुख उमेदवारांचा समावेश होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रेम सिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने १७ तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट १५ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला आहे. तर एसडीएफला केवळ शायरी मतदारसंघातून विजय मिळवता आला आहे.

विरोधी पक्षाचा एकच आमदार

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने ३१ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले आहे. विरोधी पक्ष एसडीएफला केवळ १ जागा जिंकता आली आहे. त्यामुळे सिक्कीम विधानसभेत विरोधी पक्षाचा एकच आमदार बसणार आहे. तसेच सिक्कीमचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले एसडीएफचे प्रमुख पवन कुमार चामलिंग यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. दुसरीकडे, भाजपला एकही जागा मिळालेली नाही.
सिक्कीम भाजपाचे अध्यक्ष दिल्ली राम थापा यांनाही पराभव पत्करावा लागला. थापा हे २ हजार ९६८ मतांनी पराभूत झालेत.

दुसरीकडे, अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आला आहे. भाजपने ४६ जागा जिंकल्या आहेत ज्या २०१९ च्या निवडणुकीतल्या जागांपेक्षा जास्त आहेत. एनपीईपीला ५ तर काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली आहे. तर इतरांना ८ जागा मिळाल्या आहेत.

Web Title: SKM returns to power in Sikkim with a thumping majority winning 31 out of 32 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.