भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार; स्कायमेटचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 09:47 AM2018-04-04T09:47:25+5:302018-04-04T09:55:34+5:30
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी 887 मिमी पाऊस पडेल
मुंबई: भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे. 'स्कायमेट'ने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी 887 मिमी पाऊस पडेल, असे 'स्कायमेट'ने म्हटले आहे.
भारतातील बहुतांश शेती आणि पर्यायाने इतर उद्योगधंदे पावसाच्या गणितावर अवलंबून असतात. त्यामुळे हवामान खात्याच्या पावसाविषयीच्या अंदाजाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. या अंदांजावर बाजारपेठेत अनेक चढउतारही पाहायला मिळतात. साहजिकच स्कायमेटने आज जाहीर केलेल्या अंदाजामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, मान्सूनचे संभावित वितरण
• ५% शक्यता जास्त पावसाची (हंगामी पाऊस ११०% पेक्षा जास्त आहे)
• २०% शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची (हंगामी पर्जन्य १०५% ते ११०% च्या दरम्यान)
• ५५% शक्यता सर्वसाधारण पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्यमान ९६ ते १०४% च्या दरम्यान)
• २०% शक्यता सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्य ९०% ते ९५% च्या दरम्यान)
• ०% शक्यता दुष्काळ होण्याची (हंगामी पाऊस ९०% पेक्षा कमी)
पावसाचे मासिक वितरण
जून - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १११% (जूनसाठी दीर्घकालीन सरासरी = १६४ मिमी)
• सामान्य पावसाची ३०% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची ६०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची १०% शक्यता
जुलै - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९७% (जुलैसाठी दीर्घकालीन सरासरी = २८९ मिमी)
• सामान्य पावसाची ५५% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १५% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३०% शक्यता
ऑगस्ट- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९६% (ऑगस्ट साठी दीर्घकालीन सरासरी = २६१ मिमी)
• सामान्य पावसाची ५५% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३५% शक्यता
सप्टेंबर- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०१% (सप्टेंबर साठी दीर्घकालीन सरासरी = १७३ मिमी)
• सामान्य पावसाची ६०% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची २०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची २०% शक्यता
Skymet Weather has released its #Monsoon2018 forecast at 100% LPA. Good news for the country, expect normal #Monsoon this year. https://t.co/poPO8h9nBS#MonsoonInIndia
— SkymetWeather (@SkymetWeather) April 4, 2018