"गुलामगिरीत वारसा जळून नष्ट झाला, पण..."; पंतप्रधान मोदींच्या हस्ते संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:56 AM2023-05-19T07:56:45+5:302023-05-19T08:01:27+5:30
‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.'
नवी दिल्ली : ‘गुलामगिरीच्या काळात अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली; परंतु, स्वातंत्र्यानंतर त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत,’ असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
मोदी म्हणाले, ‘शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडाने भारताचे असे नुकसान केले की आपला बराचसा लिखित आणि अलिखित वारसा नष्ट झाला. गुलामगिरीच्या काळात आपली अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली. हे केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे आणि मानवजातीचे नुकसान होते.’
‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. म्हणूनच भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात घोषणा केलेल्या ‘पंचतत्त्वां’ची घोषणा केली आहे आणि त्यातील मुख्य म्हणजे आपल्या वारशाचा अभिमान. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ४७ वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आभासी दर्शन’ सेवेचेही उद्घाटन -
पंतप्रधानांनी नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमधील राष्ट्रीय संग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल वॉकथ्रू’चे (आभासी दर्शन) उद्घाटन केले. त्यांनी भारतीय संग्रहालयांची निर्देशिक, कर्तव्य पथचा ‘पॉकेट मॅप’, म्युझियम कार्डचे प्रकाशनही केले.