गाड्यांमध्ये लागणार सेन्सर्स, चालकाची नोकरी पायलटप्रमाणे; गडकरी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:07 PM2021-09-21T22:07:01+5:302021-09-21T22:16:34+5:30
रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींच्या महत्त्वपूर्ण सूचना; लवकरच निर्णय होण्याची शक्यता
नवी दिल्ली: देशात दरवर्षी लाखो लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यात मानवी चुकांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण लक्षणीय आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत. व्यवसायिक ट्रक चालकांचा वाहन चालवण्याचा वेळ निश्चित असायला हवा असं मत गडकरींनी मांडलं आहे. याशिवाय व्यवसायिक वाहनांच्या चालकाला झोप आल्यास त्याची माहिती देणारं सेन्सर लावण्याची आग्रही भूमिकादेखील मांडली आहे.
I will also write letters to CMs and Collectors to ensure that District Road Committee meetings happen regularly. Emphasised on deciding driving hours for truck drivers of commercial vehicles, similar to pilots, to reduce fatigue-induced road accidents. pic.twitter.com/2R1jvAXAV7
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 21, 2021
वैमानिकांसाठी विमान उड्डाणाचे तास ठरलेले असतात. त्याचप्रमाणे ट्रक चालकांसाठी वाहन चालवण्याचे तास निश्चित असायला हवेत. चालक दमल्यामुळे होणारे अपघात यामुळे कमी होतील, असं गडकरींनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'युरोपियन मापदंडानुसार व्यवसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावण्याच्या धोरणावर काम करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. या सेन्सरमुळे चालकाला झोप येत असेल, तर त्याची माहिती मिळते,' असं गडकरींनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
जिल्हा रस्ते समित्यांच्या नियमित बैठकांसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. आज नितीन गडकरी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. दर दोन महिन्यांनी परिषदेची बैठक घेण्याची सूचना गडकरींनी केली.