‘फोनो’ प्रचाराने उडवली झोप
By Admin | Published: October 10, 2014 02:54 AM2014-10-10T02:54:03+5:302014-10-10T02:54:03+5:30
निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी अनेक वेगवेगळे ‘फंडे’ आणण्यात येतात.
मुंबई : निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी अनेक वेगवेगळे ‘फंडे’ आणण्यात येतात. उमेदवारांकडून विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी यंदा ‘फोनो’ प्रचारावर अधिक भर देण्यात आला आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील मतदारांना फोन करून प्रचार करतानाच मतदारांची झोप उडत असल्याचे आता समोर येत आहे. ऐन दुपारी मतदारांच्या घरातील फोन वाजत असल्याने मतदार त्रस्त होत आहेत.
विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरूच असून १३ आॅक्टोबर रोजी प्रचाराची अखेर होणार आहे. त्यामुळे प्रचारात आणखी जोर लावण्यात येत असून बाइक रॅली, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी प्रचार करण्यावर अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक उमेदवारांकडून आपला मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी ‘फोनो’ प्रचार करण्यावरही अधिक भर दिला आहे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराशी संवाद साधण्यासाठी फोनो प्रचाराची निवड करण्यात आली आहे. यात मतदारांच्या घरातील लॅण्डलाइनवर फोन करून उमेदवाराचा पक्ष, त्याचे नाव सांगून येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. उमेदवारांकडून याचे काम काही कॉल सेंटरला देण्यात आले आहे. हा प्रचार करताना मात्र कुठल्याही प्रकारचे भान राहिलेले नसून दुपारी २ ते सायंकाळी चार या दरम्यान मतदारांच्या घरातील दूरध्वनी वाजत आहेत. त्यामुळे मतदारांची झोप उडत असून नाराजीही व्यक्त केली जात आहे. मुंबई, ठाण्यातील मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी हा फंडा निवडला असून हा प्रचार बंद होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीतही भर दुपारी करण्यात येत असलेल्या प्रचारामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. (प्र्रतिनिधी)