झोपमोड झाली म्हणून मोठया भावाचे कु-हाडीने केले तुकडे
By admin | Published: April 19, 2017 12:45 PM2017-04-19T12:45:31+5:302017-04-19T13:04:08+5:30
झोपेच्यावेळी गाणे गाऊन त्रास देतो म्हणून एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या मोठया भावाची तुकडे करुन हत्या केली.
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 19 - झोपेच्यावेळी गाणे गाऊन त्रास देतो म्हणून एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या मोठया भावाची तुकडे करुन हत्या केली. छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील दौंडिलहारा गावात मंगळवारी गावक-यांसमक्ष हा भयानक प्रकार घडला. चिटूंराम झोपेच्यावेळी मुद्यामून मोठया आवाजात गाणी गाऊन त्रास देतो म्हणून सुरेश कुमारने आपल्या मोठया भावाला खेचत घराबाहेर आणले. गावातील चौकात त्याने चिंटूरामला खांबाला बांधले व कुहा-डीने वार करुन त्याची हत्या केली.
गावक-यांसमक्ष हा प्रकार घडला. आपण काय करुन बसलोय हे जेव्हा सुरेशकुमारच्या लक्षात आले तेव्हा त्याने स्वत:हून पोलिस स्थानकात जाऊन गुन्हयाची कबुली दिली. चिटूंराम नेहमी मोठया आवाजात गायचा. त्यावरुन या दोन्ही भावांमध्ये नेहमी भांडणे व्हायची असे गावक-यांनी सांगितले. त्यांची ही भांडणे नेहमीचीच झाली होती. दोघांच्या बायकांनाही त्यांच्या या भांडणांचा कंटाळा आला होता.
सुरेश तापट स्वभावाचा होता तसेच त्याने गावात अनेकदा वाद घातले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी दोघेही भाऊ एकाच खोलीत झोपलेले असताना चिंटूरामने गाणे गायला सुरुवात केली. चिंटूरामच्या गायनाने झोप मोड होत असल्याने संतापलेल्या सुरेशने त्याला मारहाण सुरु केली. दोघांमध्ये झटापट सुरु असताना चिंटूरामने तिथे असलेली कु-हाड उचलली. सुरेशने माघार घ्यावी यासाठी चिंटूराम त्याला कुहा-डीचा धाक दाखवत होता.
पण सुरेशने आपल्या ताकतीच्या बळावर चिंटूरामच्या हातातून कु-हाड हिसकावून घेतली व त्याला खेचत घराबाहेर आणून इलेक्ट्रीकच्या खांबाला बांधले. दोघांमध्ये हा प्रकार सुरु असताना तिथे गावकरी जमले. गावक-यांनी सुरेशला रोखण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या दोघांमध्ये कोणी आले तर मारुन टाकीन अशी धमकीच सुरेशने दिली. सुरेशच्या हातात कु-हाड असल्याने कोणी पुढे जाण्याचे धाडस केले नाही. त्यानंतर सुरेशने कु-हाडीने वार करुन आपल्या भावाची हत्या केली. पोलिसांनी सुरेश विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.