तुरुंगात स्लो पॉयझनिंगचा आरोप; माफिया डॉन मुख्तार अन्सारी आयसीयूत भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 08:36 AM2024-03-26T08:36:11+5:302024-03-26T08:43:35+5:30
मुख्तारच्या तब्येतीवर ना जिल्हा प्रशासन ना पोलीस ना तुरुंग प्रशासन काही बोलण्यास धजावत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्तारच्या सुरक्षेवरून जेलर आणि दोन डेप्युटी जेलर यांना निलंबित करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशच्या बांदा जेलमधून महत्वाची बातमी येत आहे. शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारी याची तब्येत अचानक बिघडली असून त्याला मेडिकल कॉलेजमधील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. स्लो पॉयझनिंग करत असल्याचा आरोप मुख्तारने केला होता.
मुख्तारच्या तब्येतीवर ना जिल्हा प्रशासन ना पोलीस ना तुरुंग प्रशासन काही बोलण्यास धजावत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्तारच्या सुरक्षेवरून जेलर आणि दोन डेप्युटी जेलर यांना निलंबित करण्यात आले होते. मुख्तार काही दिवसांपासून युरिनल इन्फेकशनमुळे त्रस्त होता.
मुख्तारला सोमवारी रात्री जिल्हा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितल्याने ताबडतोब त्याला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्य़ात आले आहे. मुख्तारने काही दिवसांपूर्वी स्लो पॉयझन दिले जात असल्याचा आरोप केला होता. २१ मार्चला कोर्टात त्याने वकिलांमार्फत हा आरोप केला होता. १९ मार्चला रात्री त्याला विषारी पदार्थ देण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. यामुळे त्याची तब्येत बिघडल्याचे त्याने म्हटले होते.
यानंतर कोर्टाच्या आदेसानुसार दोन डॉक्टरांची टीम तुरुंगात गेली होती. तपासणीनंतर त्याचे रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते. या रिपोर्टनंतर त्याला काही औषधे देण्यात आली होती. रोजा ठेवल्याने असे होत असल्याचे डॉक्टरांनी तुरुंग प्रशासनाला सांगितले होते. उपाशी राहिल्यानंतर अचानक जास्त खाल्ल्याने असे होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते.