लोकशाहीचा विजय असो! अवघ्या 12 मतदारांसाठी 14 हजार फूट उंचीवर मतदान केंद्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 10:36 AM2019-04-09T10:36:45+5:302019-04-09T11:15:15+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये एक असा मतदारसंघ आहे जेथे सर्वात कमी मतदार आहेत तसेच मतदान केंद्र ही उंचावर आहे.
लेह - लोकसभा 2019 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी योग्य सुविधा पुरवण्याची जबाबदारी देखील आयोग घेत असतं. जम्मू-काश्मीरमध्ये एक असा मतदारसंघ आहे जेथे सर्वात कमी मतदार आहेत तसेच मतदान केंद्र ही उंचावर आहे.
जम्मू-काश्मीरच्या लेहमध्ये एक मतदारसंघ आहे जेथे केवळ 12 मतदार आहेत. लेहचे निवडणूक अधिकारी अन्वी लवासा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाख मतदारसंघातील लेह विधानसभा क्षेत्रातील गाइक गावात एका केंद्रावर केवळ 12 मतदार आहेत. यातील 7 महिला तर 5 पुरुष मतदार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात उंचीवर हे केंद्र तयार करण्यात आले आहे. समुद्र सपाटीपासून 14 हजार 890 फुट उंचीवर हे मतदान केंद्र आहे. लडाख मतदारसंघात एकूण 11 हजार 316 मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे हे मतदान केंद्र लवासा यांनी सांगितले. या मतदारसंघात 78 लाख 42 हजार 979 मतदार आहेत. लेह विधानसभा मतदारसंघात 294 केंद्र आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू; चकित झालात?... पण हे खरं आहे!
लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. मात्र देशात एक अशी जागा आहे जिथे हे मतदान सुरूही झालं आहे. चकित झालात?... पण हे खरं आहे. भारत -तिबेट सीमा सुरक्षादलाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या चौकीवर शुक्रवारी (5 एप्रिल) हे मतदान घेण्यात आलं. भारत-तिबेटची ही सीमा अरुणाचल प्रदेशमधून जाते. लोहितपूरमध्ये पोस्टल मतदानाच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) मतदान केलं आहे. यामध्ये 80 पोलिसांचा समावेश होता. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधले मतदान दोन निवडणुकांसाठी मतदान करत आहेत. त्यासोबतच भारत - तिबेट पोलीस दलात देशभरातल्या विविध भागांतून आलेले पोलीस कर्मचारीही आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी हे मतदान केलं आहे. ITBP च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआयजी सुधाकर नटराजन यांनी जवानांमध्ये सर्वप्रथम मतदान केलं आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.