भारतापासून प्रेरणा घेत आता इराणमध्येही ‘स्मार्ट सिटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:54 AM2017-08-08T03:54:59+5:302017-08-08T03:55:05+5:30
भारत आणि इराण या दोन्ही देशांमधील विश्वास आणखी वाढीस लागला आहे. भारतातील ‘स्मार्ट सिटी’च्या ‘मॉडेल’ने तर इराणमधील नेत्यांना विशेष प्रभावित केले आहे.
योगेश पांडे
नागपूर : भारत आणि इराण या दोन्ही देशांमधील विश्वास आणखी वाढीस लागला आहे. भारतातील ‘स्मार्ट सिटी’च्या ‘मॉडेल’ने तर इराणमधील नेत्यांना विशेष प्रभावित केले आहे. आता इराणदेखील ‘स्मार्ट सिटी’ उभारणार असून त्या अनुषंगाने तेथील प्रतिनिधी भारतात येऊन पाहणी व अभ्यास करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या शपथविधी सोहळ्यात भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गडकरी यांनी उपस्थिती लावली. गडकरी यांचा हा इराणदौरा दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करणारा राहिला. या दौऱ्याबाबत गडकरी यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
उपराष्ट्रपती इशाक जहांगिरी यांच्याशी या दौऱ्यात आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रपती तसेच महत्त्वाच्या नेत्यांसोबतही विविध मुद्यांवर चर्चा झाली. इराणमधील इतर बंदरांचा विकास करण्यात भारताने पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव त्यांच्यातर्फे देण्यात आला आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
चाबहार २०१८मध्ये कार्यान्वित होणार
पाकिस्तानमध्ये चीनकडून ग्वाहार हे बंदर तयार करण्यात येत आहे. मात्र आपणदेखील पूर्ण ताकदीने इराणच्या चाबहार येथील बंदराच्या निर्मितीसाठी लागलो आहे. चाबहार ते गुजरातमधील कांडला बंदर हे अंतर मुंबई ते दिल्ली या अंतराहून कमी आहे व पाकिस्तानमार्गे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चाबहार बंदर विकासासाठी ६०० कोटींची उपकरणे बसवण्यात येणार असून, त्यासाठी ३८० कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी मिळाली आहे. शिवाय चाबहारहून विशेष रेल्वेमार्ग बांधायला घेतला असून तो २०१८मध्ये पूर्ण झाल्यावर अफगाणिस्तानमार्गे थेट रशियात जाणे शक्य होणार आहे.
हनुमानासारखे श्रीलंकेत पुन्हा या !
गेल्या तीन वर्षांत जगभरात देशाचे ‘गुडविल’ वाढत असल्याचे प्रत्यंतर या समारंभातही आल्याचे गडकरींनी सांगितले. या दौऱ्यात अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी अहमदझै यांच्याशीही त्यांची भेट झाली. तेथे भारताकडून उभारण्यात येत असलेल्या महामार्ग व रेल्वे प्रकल्पांवर या भेटीत चर्चा झाली. श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी तर या भेटीत गडकरींकडे वेगळाच आग्रह धरला. ‘ज्याप्रमाणे हनुमान लंकेत आले होते, तसे गडकरी तुम्ही येऊन श्रीलंकेत रस्ते व पूल बांधून द्या’, अशी विनंती श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी केली.
कोकणचा हापूस इराणमध्ये
कोकणातील हापूस आंबा आतापर्यंत इराणला निर्यात होत नव्हता. काही तांत्रिक कारण आणि दर्जाबाबत संभ्रम, यामुळे निर्यातप्रक्रिया थंड पडली होती.
मात्र हापूस आंब्याचा दर्जा हा सर्वोत्तम असल्याचे इराणच्या नेत्यांना सांगितले आहे. तेदेखील आता हापूस मागविण्याबाबत सकारात्मक आहेत, असे गडकरी म्हणाले.