स्मॉग टॉवर्स, कृत्रिम पाऊस उपयोगी नाही! भारताच्या वायु प्रदूषणावर अमेरिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 07:10 AM2024-02-20T07:10:00+5:302024-02-20T07:10:16+5:30
भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे. धुक्यांचे मनोरे (स्मॉग टॉवर्स) आणि कृत्रिम पाऊस (क्लाउड सीडिंग) यासारख्या किफायतशीर तंत्रज्ञान हे देशातील प्रदूषणाच्या समस्येवर शाश्वत उपाय नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक वायू प्रदूषण आणि आरोग्य तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य रिचर्ड पेल्टियर म्हणाले की संपूर्ण भारतात वायू प्रदूषण खरोखरच वाईट आहे, याची जाणीव आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ते रोखण्यासाठी अचूकपणाची कमतरता आहे.
हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने नदी कोरडे करणे!
‘स्मॉग टॉवर्स’च्या भूमिकेबद्दल विचारले असता पेल्टियर म्हणाले की हे हवा स्वच्छ करणारे हे विशाल ‘एअर प्युरिफायर’ अल्पप्रमाणात प्रदूषण कमी करतात, परंतु खर्च आणि देखभाल आव्हानांमुळे संपूर्ण शहरांसाठी अव्यवहार्य आहेत. हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने एखादी मोठी नदी कोरडे करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कृत्रिम पाऊस हाही निश्चितपणे दीर्घकालीन उपाय नाही.
आयुर्मानात ५.३ वर्षे घट
स्वतंत्र विचारगट ग्रीनपीस इंडियाच्या मते देशातील ९९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पीएम २.५ पेक्षा जास्त डब्ल्यूएचओ मानकांपेक्षा जास्त हवेत श्वास घेते.
६२ टक्के गर्भवती महिला आणि ५६ टक्के लोकसंख्या सर्वाधिक प्रदूषित भागात राहतात.
सूक्ष्म कण वायू प्रदूषण भारतात सरासरी आयुर्मान ५.३ वर्षे आणि दिल्लीत ११ वर्षांपर्यंत कमी करते.
स्वच्छ हवेसाठी अमेरिकेला लागली ५० ते ६० वर्षे
दिल्लीत वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी किती वेळ लागेल, असे विचारले असता त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले.
अमेरिकेने १९६० च्या दशकात स्वच्छ वायू कायदा लागू केला आणि अलीकडेच देशाने चांगली मानली जाणारी हवेची गुणवत्ता विकसित केली आहे. येथपर्यंत येण्यासाठी ५० वर्षे लागली.
ही तात्कालिक समस्या नाही. हे काही एका कलमाच्या किंवा कायद्याच्या फटक्याने सोडवली जाणार नाही, असे पेल्टियर म्हणाले.