शाकाहारी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी, धुम्रपान करणाऱ्यांनाही सर्वेक्षणातून सुखद धक्का
By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 11:05 AM2021-01-18T11:05:32+5:302021-01-18T11:12:08+5:30
१० हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचे नमूने घेऊन करण्यात आलं सर्वेक्षण
कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. संपूर्ण भारतात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणानुसार धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती आणि शाहाकारी व्यक्तींमध्ये कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती समोर आली आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चनं ४० ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या रक्तगट 'ओ' किंवा 'ए' आणि जे खासगी वाहन, शाकाहारी पदार्थांचं सेवन करतात त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी असू शकतो. तर ज्यांचा रक्तगट 'बी' आणि 'एबी' आहे त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असू शकतो असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चनं व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडिज आहेत किंवा नाहीत याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या प्रयोगशाळेतील आणि संस्थेमध्ये काम करणार्या १० हजार ४२७ वयस्कर व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नमूने घेतले. ज्या व्यक्तींना स्वइच्छेनं यात सहभागी व्हायचं आहे अशाच व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला. १० हजार ४२७ व्यक्तींचे नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ०५८ म्हणजेच १०.१४ टक्के लोकांमध्ये SARS-CoV-2 चे अँटिबॉडिड असल्याचं कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च आणि इंस्टीट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (IGIB), दिल्ली यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
"गोळा करण्यात आलेल्या नमून्यांपैकी ३४६ सिरो पॉझिटिव्ह व्यक्तींच्या तीन महिन्यांनंतर केलेल्या तपासणीनंतर त्यांच्यात SARS-CoV-2 च्या प्रती असलेल्या अँटिबॉटिजचा प्रमाण स्थिर पासून अधिक इतकं होतं. परंतु विषाणूचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक असलेली प्लाझ्मा अॅक्टिव्हिटीत मात्र घसरण दिसून आली," अशी माहिकी आयजीआयबीमधील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि या अभ्यासाचे सह-लेखक शंतनू सेनगुप्ता यांनी सांगितलं. "३५ व्यक्तींचे सहा महिन्यांनंतर पुन्हा नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. परंतु अँटिबॉडीचा स्तर हा तीन महिन्यांच्या तुलनेत कमी झालेला दिसला. तर विषाणूचा परिणाम कमी करणार्या अँटिबॉडीचं प्रमाण स्थिर असल्याचं दिसून आलं," असंही ते म्हणाले.
धुम्रपान करणाऱ्यांना संक्रमणाचा धोका कमी
"धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये सिरो पॉझिटिव्ह असण्याची शक्यता कमी आहे असा आमचा निष्कर्ष आहे. कोरोनामुळे श्वसनासंबंधी आजार निर्माण होत असला तरी धुम्रपानामुळे यापासून बचाव होऊ शकतो," असंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. या अभ्यासात फ्रान्समधील दोन, इटली, न्ययॉर्क, आणि चीनमधील सर्वेक्षणाच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. त्यामध्येही धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये संक्रमणाचा दर कमी असल्याचं दिसून आलं होतं.