Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 06:52 IST2023-06-30T06:51:40+5:302023-06-30T06:52:02+5:30
Amarnath Yatra: एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे!
जम्मू : एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, यात्रेकरूंचा पहिला जत्था ३० जूनला जम्मू-भगवतीनगर तळ शिबिरापासून गुहेकडे रवाना होईल.
गतवर्षी पवित्र गुहेजवळ ढगफुटीमुळे पूर आला होता. त्यामुळे दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना लक्षात घेता अडीच किमीच्या अतिजोखीम क्षेत्रात यात्रेकरूंसाठी हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे.
३ लाख भाविकांची झाली नोंदणी
२८ जूनपर्यंत सुमारे ३.०४ लाख लोकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा टक्के अधिक आहे.
हेल्मेट नि:शुल्क
चरावरून जाणाऱ्यांनाही हेल्मेट अनिवार्य असेल, असे श्री अमरनाथ विश्वस्त मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनदीप कुमार भंडारी यांनी सांगितले. विश्वस्त मंडळाकडून हेल्मेट नि:शुल्क दिले जाणार आहे.
यात्रेकरूंसाठी ‘ऑन द स्पॉट’ नोंदणी
जम्मू : अमरनाथ तीर्थयात्रेसाठी येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने गुरुवारी जागेवरच नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या यात्रेसाठी साधूंसह १,५०० हून अधिक यात्रेकरू जम्मू शहरात पोहोचले आहेत. अनोंदणीकृत यात्रेकरूंच्या जागेवरच नोंदणीसाठी शहरातील शालिमार परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर पुरानी मंडईतील राममंदिर संकुलात साधूंच्या नोंदणीसाठी विशेष शिबिर सुरू करण्यात आले आहे.
ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प
गोपेश्वर (उत्तराखंड) : मुसळधार पावसामुळे चमोली जिल्ह्यातील छिंका येथे दरड कोसळून ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. लवकरच रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
अमरनाथ यात्रेपूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी येथे प्रत्येकी १०० खाटांची दोन रुग्णालये बांधली आहेत. प्रशासनाने दोन्ही रुग्णालयांसाठी १३-१३ कोटी रुपये खर्च केले आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण सचिव भूपिंदर कुमार यांनी सांगितले.