स्मृती इराणी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 09:28 AM2017-12-19T09:28:33+5:302017-12-19T09:41:46+5:30
यावेळी भाजपा विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न देता नव्या चेह-याला संधी देणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. 182 जागांच्या विधानसभेत भाजपाने 99 जागा जिंकल्या असून, दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रसने 77 जागांवर विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. सलग सहाव्यांदा भाजपा आपलं सरकार स्थापन करणार आहे. भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चाही रंगू लागली आहे. यावेळी भाजपा विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न देता नव्या चेह-याला संधी देणार असल्याची माहिती आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांची नेतृत्वक्षमता पाहता मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना पहिली पसंती आहे. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. स्मृती इराणी यांनीदेखील हे वृत्त फेटाळत आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हटलं आहे.
याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांचं नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मनसुख मांडविया पाटीदार समाजाचे आहेत. ते शेतक-यांचे जवळचे नेते आहेत. कर्नाटकचे राज्यपाल आणि गुजरात विधानसभाचे माजी अध्यक्ष वजूभाई वाला यांचं नावही चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.
हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.