स्मृती इराणींनी पकडला चेंजिंग रूमवरील कॅमेरा
By admin | Published: April 4, 2015 05:15 AM2015-04-04T05:15:26+5:302015-04-04T05:15:26+5:30
गोवा भाजपाच्या प्रभारी व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी उत्तर गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूमवर लावलेला ‘छुपा कॅमेरा’
पणजी : गोवा भाजपाच्या प्रभारी व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी उत्तर गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूमवर लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकडल्याने मोठी खळबळ उडाली. इराणी यांनी भाजपाचे स्थानिक आमदार मायकल लोबो यांना त्याची माहिती दिली. लोबो यांनी तक्रार दाखल केल्यानंतर एफआरआय दाखल झाल्याची माहिती कळंगुट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांनी दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सायंकाळी गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला.
पणजीपासून १५ किलोमीटरवरील थिवी येथे इराणी यांचे घर आहे. इराणी खासगी कारणास्तव गोवा भेटीवर आल्या होत्या. इराणी शुक्रवारी कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या शोरूममध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांना चेंजिंग रूमवर छुपा कॅमेरा बसविल्याचे आढळून आले. त्यांनी आमदार लोबो यांना माहिती दिली. लोबो यांनी ‘फॅब इंडिया’ शोरूमविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. पोलिसांनी इराणी यांचा जबाब घेतला आहे. ‘फॅब इंडिया’ची गोव्यात अनेक शोरूम्स आहेत.
खरेदीसाठी आलेले पर्यटक मौल्यवान वस्तू चोरून नेण्याची भीती असते. त्यामुळे काउंटरवर ‘छुपे कॅमेरे’ बसविलेले असतात, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र आता थेट एका केंद्रीय मंत्र्यानेच छुपा कॅमेरा पकडल्याने ब्रँडेड तसेच नावाजलेल्या शोरूमच्या चेंजिंग रूम महिलांसाठी किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उपस्थित होतोे.