स्मृती इराणींनी मुलायमसिंहांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:50 IST2022-01-31T15:47:18+5:302022-01-31T15:50:22+5:30
संसद प्रवेश द्वारातून बाहेर पडताना स्मृती इराणी आणि मुलायमसिंह यादव हे एकमेकांच्या पुढे-मागे येत होते. यावेळी, स्मृती इराणींनी मुलायमसिंह यादव यांना पाहिले असता त्यांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले

स्मृती इराणींनी मुलायमसिंहांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले, फोटो व्हायरल
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांनी आज संसद परिसरात हजेरी लावली. त्यात केंद्रीयमंत्री स्मृती इराणी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या 5 राज्यांतील निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना हा फोटो व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.
संसद प्रवेश द्वारातून बाहेर पडताना स्मृती इराणी आणि मुलायमसिंह यादव हे एकमेकांच्या पुढे-मागे येत होते. यावेळी, स्मृती इराणींनी मुलायमसिंह यादव यांना पाहिले असता त्यांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले. त्यावेळी पायऱ्या उतरत असल्याने मुलायमसिंह हे अतिशय हळुवार पाऊल टाकत होते. त्यामुळे, स्मृती इराणींनी त्यांना पायऱ्या उतरण्यास मदत केली. हे पाहून सुरक्षा रक्षकही धावत-पळत तेथे मदतीसाठी आले. दरम्यान, भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही मुलायमसिंह यांचा हात धरुन त्यांना चालण्यासाठी मदत केली. त्यावेळी, या दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ संवादही झाला.
राहुल गांधींसोबत नजरानजर
स्मृती इराणींचा आणखी एक फोटो समोर आला आहे. त्यामध्ये, काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत त्यांनी नजरानजर झाल्याचे दिसून येते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये कुठलाही संवाद झाला नाही. लोकसभा सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळी पायऱ्यांवर हे दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेले दिसत आहेत.