स्मृती इराणींवर पंतप्रधान मोदी नाराज; अंधारात ठेवून घेतला होता 'फेक न्यूज'बद्दलचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 01:28 PM2018-04-04T13:28:47+5:302018-04-04T13:28:47+5:30
वादग्रस्त निर्णयामुळे पंतप्रधान मोदींनी स्मृती इराणींना झापलं
केंद्र सरकारने फेक न्यूजबद्दलचा आदेश अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला. पंतप्रधान मोदींनी हा आदेश मागे घेतल्याने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. या संपूर्ण प्रकरणात मोदींना अंधारात ठेवण्यात आल्याने ते अतिशय नाराज झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारला या प्रकरणात यू टर्न घ्यावा लागल्याने मोदींनी स्मृती इराणी यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
फेक न्यूज प्रकरणात पत्रकाराची मान्यता रद्द करण्याचा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केला होता. मात्र यामुळे मोदी सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. सोमवारी जारी करण्यात आलेला हा आदेश पंतप्रधान कार्यालयाने अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला. मनुष्यबळ विकास मंत्री असताना स्मृती इराणी अनेकदा वादात सापडल्या होत्या. मात्र माहिती आणि प्रसारण खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच स्मृती इराणी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
स्मृती इराणी यांच्या माहिती आणि प्रसारण खात्याने फेक न्यूज प्रकरणात काढलेल्या आदेशावर पंतप्रधान मोदी अतिशय नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात स्मृती इराणींना स्पष्ट संदेश देण्याचा मोदींचा मानस होता. त्यामुळेच इराणी यांच्या खात्याने काढलेला आदेश पंतप्रधान कार्यालयाने अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला. स्मृती इराणींनी घेतलेल्या या निर्णयाची तुलना राजीव गांधी सरकारने 1980 मध्ये घेतलेल्या मानहानी कायद्याशी केली जात होती. त्यातच इराणींनी इतका मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेताना मोदींना अंधारात ठेवले होते. त्यामुळे मोदी अतिशय नाराज होते.
'पंतप्रधान मोदींनी फेक न्यूज संदर्भातील आदेश मागे घेण्याची सूचना केली होती. याबद्दलचा निर्णय प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाकडे सोपवण्यात यावा, असे मोदींनी सांगितले होते,' असे पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसावा, अशी भूमिका मोदींनी मांडल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.