मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीत स्मृती इराणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:27 AM2021-07-14T11:27:54+5:302021-07-14T11:29:23+5:30
मंत्रिमंडळ राजकीय व्यवहार समितीत पाच नव्या मंत्र्यांचा समावेश. काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते मंत्रिमंडळात फेरबदल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत शक्तिमान अशा मंत्रिमंडळ राजकीय व्यवहार समितीत (पीएसीसी) स्मृती इराणी, भूपेंद्र यादव आणि मनसुख मांडविया यांच्यासह पाच नव्या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश केला. इराणी आणि यादव यांचा समितीतील समावेश हा महत्त्वाचा मानला जातो, कारण दोघांकडेही अ-राजकीय खाती असली तरी ते राजकीय भूमिका बजावू शकतील.
मोदी यांनी या समितीत सर्बानंद सोनोवाल (आसाम), गिरिराज सिंह (बिहार) यांचाही समावेश केला. मनसुख मांडविया (गुजरात) यांचा समावेश महत्त्वाचा यासाठी की, मोदी आणि केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे गुजरातचेच. अमित शहा हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व आठ समित्यांत, तर राजनाथ सिंह व नितीन गडकरी हे फक्त चार समित्यांमध्ये आहेत.
महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिलेले नारायण राणे यांचा समावेश गुंतवणूक आणि विकासावरील मंत्रिमंडळ समितीत करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे (नागरी उड्डयन) आणि अश्विनी वैष्णव (रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान) यांचाही या समितीत समावेश केला गेला आहे.
संसदीय व्यवहार समितीत मुंडा
आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीत आदिवासी कामकाजमंत्री अर्जुन मुंडा यांना संसदीय व्यवहार समितीत वीरेंद्र कुमार, किरेन रिजिजू आणि अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह घेण्यात आले आहे. मुंडा हे झारखंडमध्ये पक्षाचा चेहरा असतील हा त्यामागील हेतू दिसतो. अशीच स्थिती ही अनुराग ठाकूर यांची असून, ते हिमाचल प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.