पत्रातील ‘स्पेलिंग मिस्टेक’मुळे स्मृती इराणी नव्या वादात
By Admin | Published: August 21, 2015 10:31 PM2015-08-21T22:31:18+5:302015-08-21T22:31:18+5:30
मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रातील चुकांकडे एका शिक्षिकेने लक्ष वेधताच सध्या हे पत्र नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनले असून
नवी दिल्ली : मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रातील चुकांकडे एका शिक्षिकेने लक्ष वेधताच सध्या हे पत्र नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनले असून त्यावरील तीव्र प्रतिक्रियांमुळे स्वत: इराणी यांनी ही चूक माझी नाही, असे सांगत हात झटकले आहेत. दरम्यान या चुकीबद्दल इराणी यांनी सीबीएसईला स्पष्टीकरण मागितले आहे.
विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करणारी पत्रे इराणी यांच्या स्वाक्षरीनिशी पाठविण्यात आली आहेत. त्यातील ‘मिनिस्टर‘ आणि ‘संसाधन’ हे दोन शब्द चुकीचे लिहिले आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलच्या शिक्षिका रिचा कुमार यांनी ही चूक लक्षात आणून देताना फेसबुकवरील पोस्टवर एक शेराही मारला आहे.
‘‘माझ्या अभिनंदनाबद्दल आभार. गेल्या २० वर्षांपासून मी शिक्षिका आहे. तुमच्या सरकारी पत्रातील चुका माझ्यासारख्या भाषा शिक्षिकेच्या मनाला खटकल्या आहेत. निदान तुमच्या मंत्रालयात काम करणारे लोक तरी चांगल्याप्रकारे शिक्षित असावे ही खबरदारी कृपया घेतली जावी’’, असे त्या म्हणाल्या. त्यांनी फेसबुकवर चुका दाखविणारे पत्र टाकल्याने नेटवर संतप्त प्रतिक्रिया होऊ लागताच इराणी यांना जाग आली. त्यांनी तडकाफडकी चौकशीचा आदेश दिला आहे. ही चूक माझी नाही.
मी हिंदीत माझे नाव लिहिण्यात चूक करणार नाही, असे स्पष्टीकरण देणारे टिष्ट्वट जारी करीत त्यांनी सारवासारव चालविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)