स्मृती इराणींचा पाठलाग करणे त्या चार जणांना पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 12:51 PM2018-04-17T12:51:01+5:302018-04-17T12:51:01+5:30
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी गैरव्यवहार व त्यांचा पाठलाग केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी गैरव्यवहार व त्यांचा पाठलाग केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. गेल्या वर्षी स्मृती इराणी इंदिरा गांधी एअरपोर्टहून चाणक्यपुरीतील हॉटेल अशोक येथे जात होत्या. त्यावेळी 4 तरुणांनी स्मृती इराणी यांच्याशी गैरवर्तन केलं. या चार जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टहून निघाल्यानंतर म्यानमार दूतावासाच्याजवळ पोहचल्या. त्यावेळी एका चारचाकी गाडीत 4 तरुण होते. त्यांनी तेथून स्मृती इराणी यांच्याकडे एकटक पाहायला सुरूवात केली तसंच त्यांचा पाठलाग केले. त्यानंतर स्मृती इराणी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची तक्रार पोलिसांकडे केल्यावर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला पण पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडलं. वैद्यकिय तपासणीनंतर ते चौघंही दारूच्या नशेत असल्याचं समजलं.
चौघंही आरोपी दिल्ली विद्यापिठाच्या राम लाल आनंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. स्मृती इराणींशी गैरवर्तन केलं तेव्हा ते चार तरुण मित्राची वाढदिवसाची पार्टी उरकून परतत होते. पोलिसांनी त्याचवेळी त्यांना अटक केली पण नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, आता पोलिसांनी या चार तरुणांविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केलं असून त्यां चौघांना तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.