नियतीचा क्रूर खेळ! सर्पदशांने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणाचा सर्पदंशानेच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 10:37 AM2022-08-05T10:37:48+5:302022-08-05T10:39:53+5:30
सर्पदंशाने भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा ही साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 72 तासांत एकाच घरातील 3 जणांना साप चावला आणि यामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्पदंशाने भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाचा ही साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झोपेत असताना सापाने त्यांना दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ललिया पोलीस ठाण्याचे अधिकारी राधा रमन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, भवनियापूर गावातील 38 वर्षीय अरविंद मिश्रा याला दोन ऑगस्ट रोजी साप चावला. यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने दुसऱ्या ठिकाणी रेफर केलं. याच दरम्यान अरविंद मिश्राचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ गोविंद मिश्रा अंत्यविधीसाठी गावात आला होता.
भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला गोविंद आणि त्याचे नातेवाईक चंद्रशेखर पांडे घरी थांबले होते. झोपेत असताना गोविंदला साप चावला आणि त्यांचा एक नातेवाईकदेखील त्या खोलीत झोपला होता. त्यालाही सापाने दंश केला. गोविंदला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे त्याची प्रकृती गंभीर होती अन् नंतर त्याचा मृत्यू झाला. तर नातेवाईक गंभीर असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आहे. स्थानिक आमदार कैलाश शुक्ला यांनी कुटुंबाची भेट घेतली असून, मदतीचं आश्वासन दिलं आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बलरामपूर येथील दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.