'आई, दीदी चिमटा काढतेय' असं चिमुरडी सांगत होती, पण सापाने दोन बहिणींना आधीच दंश केला होता!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:39 PM2020-07-01T13:39:29+5:302020-07-01T13:48:18+5:30
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, छोटी मुलगी सियाने रात्री आईला उठवून सांगितलं की, मोठी बहीण रवीनाने चिमटा काढला.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
तीन वर्षाच्या लहान मुलीने रात्री आईला उठवलं आणि सांगितलं की, आई ताई चिमटा काढत आहे. आईनेही झोपेतच 14 वर्षीय मुलीला रागावलं आणि शांतपणे झोपण्याची तंबी दिली. मात्र, तिने सुद्धा काहीतरी चावत असल्याचं सांगितलं. काही वेळाने लहान मुलीच्या पोटात दुखू लागलं तर आईने तिला पाणी पाजलं आणि पोटाची मालिश केली. धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं होत असताना बिछान्यात लपून बसलेल्या विषारी सापाची आईला जराही खबर लागली नाही.
काही वेळाने 14 वर्षाच्या मोठ्या मुलीला सुद्धा त्रास होऊ लागला होता. मुलींचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारी एक महिला आली तर तिने सापाला रूममधून बाहेर जाताना पाहिलं. घरात चार मुली होत्या. चारही मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, दुर्दैवाने तीन वर्षाची मुलगी सिया सारथी मरण पावली. तर 14 वर्षीय मुलगी गंभीर होती.
लहान मुलीच्या मृत्युनंतर रवीनाला आवश्यक उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. कारण तिचीही स्थिती गंभीर होती. छत्तीसगढच्या बधियाचुआं गावातील ही घटना असून ममता सारथीने पोलिसांना सांगितले की, ती पतीपासून तीन वर्षांपासून वेगळी राहते. तिला चार मुली आहेत. तिच मुलींचा सांभाळ करते.
पोलिसांना महिलेने दिलेल्या माहितीनुसार, छोटी मुलगी सियाने रात्री आईला उठवून सांगितलं की, मोठी बहीण रवीनाने चिमटा काढला. तर रवीनाला ओरडत आईने झोपण्यास सांगितले. तर ती सुद्धा काहीतरी चावल्याचं म्हणाली. याच बिछान्यात आणखी दोन मुली झोपल्या होत्या. महिला सियाला झोपवू लागली.
काही वेळाने सियाने पोटात दुखत असल्याचं सांगितलं तर महिलेने तिच्या पोटावरून हात फिरवला. नंतर तिला जरा पाणी पाजलं. काही वेळातच रवीना त्रास होत असल्याने ओरडू लागली. दरम्यान शेजारजी महिला आली. तोपर्यंत लहान मुलगी बेशुद्ध झाली होती.
मुलीचे आजोबा बुटू सारथी यांनी लगेच 108 डायल केला. सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच लहान मुलीचा जीव गेला होता. संतापजनक बाब म्हणजे मुलींसोबत झालेल्या घटनेची माहिती त्यांच्या वडिलांना देण्यात आली. पण तो बघण्यासाठीही आला नाही.
काय सांगता! ...म्हणून एका अस्वलाला सुनावली गेली चक्क मृत्युदंडाची शिक्षा, अनेकांनी केला विरोध!
घरात आलेल्या पाहूण्यानं सर्वांची उडवली झोप; घ्यावी लागली रेस्क्यू टीमची मदत