मध्यान्ह भोजनात निघाला साप; 30 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात पाठवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:02 PM2023-01-10T17:02:21+5:302023-01-10T17:03:05+5:30
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका शाळेतील मध्यन्ह भोजनात चक्क साप आढळल्याची घटना समोर आली आहे.
कोलकाता- शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात अनेकदा किडे-आळ्या आढळल्याच्या बातम्या येत असतात. पण, पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शाळेतील किमान 30 मुलांना मध्यन्ह भोजनानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारण काय, तर शाळेत दिलेल्या मध्यान्ह भोजनात चक्क साप आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर ब्लॉकमधील एका प्राथमिक शाळेतील सुमारे 30 विद्यार्थी मध्यान्ह भोजनात दिलेले अन्न खाल्ल्याने आजारी पडले. अन्न तयार करणाऱ्या शाळेतील एका कर्मचाऱ्याने डाळीने भरलेल्या डब्यात साप सापडल्याचा दावा केला. हे अन्न खाल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर त्यांना रामपूरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) दीपांजन जाना यांनी पत्रकारांना सांगितले की, अनेक गावकऱ्यांकडून माध्यान्ह भोजन घेतल्यानंतर मुले आजारी पडत असल्याच्या तक्रारी आल्या. यानंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली. सर्व मुलांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. दुसरीकडे, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला घेराव घालत त्यांच्या दुचाकीचं नुकसान केलं. पण, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.