पतीला संपवण्यासाठी खोलीत सोडला साप
By Admin | Published: August 17, 2016 02:51 PM2016-08-17T14:51:11+5:302016-08-17T17:49:22+5:30
अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणा-या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. विशेष म्हणजे या हत्येमध्ये सर्पदंशाचा प्रयत्न झाला.
ऑनलाइन लोकमत
कोईमबतोर, दि. १७ - अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणा-या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. विशेष म्हणजे या हत्येमध्ये सर्पदंशाचा प्रयत्न झाला. तामिळनाडूतील कोईमबतोर शहरात हे हत्याकांड घडले. पतीचा मृत्यू ही हत्या नसून दुर्घटना वाटावी यासाठी सापाचा वापर केला.
या प्रकरणातील आरोपी सुंदरमचे शारदा बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. शारदला प्रेमसंबंधात पती सक्तीवेलचा अडथळा वाटत होता. म्हणून तिने पती सक्तीवेलला संपवण्यासाठी सुंदरमला १५ हजार रुपये दिले. नंतर जिम काढण्यासाठी तिने सुंदरमला पाच लाख देण्याचे आश्वासन दिले होते.
आधी त्यांनी सापाच्या विषप्रयोगाचा प्रयत्न केला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पत्तानपुदूर येथे एक विषारी साप पकडला व सक्तीवेलच्या खोलीत सोडला. पण साप सक्तीवेलला दंश न करता तिथून निघून गेला. त्यामुळे दोघांनी सक्तीवेलला मारहाण करुन संपवण्याचा निर्णय घेतला.
आठ ऑगस्टला सुंदरम, कृष्णा आणि शारदाने लाकडी काठीने सक्तीवेलला जीव जाईपर्यंत बेदम मारहाण केली. सक्तीवेलचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह घराच्या टाकीत टाकून दिला. कृष्णा सुंदरमच्या दुकानात नोकरी करतो. नऊ ऑगस्टला या प्रकरणी शारदाला अटक झाल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.