मुलांच्या जेवणात साप, अनेक विद्यार्थी आजारी; पश्चिम बंगालमधील धक्कादायक प्रकार समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 07:39 AM2023-01-11T07:39:18+5:302023-01-11T07:58:09+5:30
मयुरेश्वर ब्लॉकमधील एका प्राथमिक शाळेतील सुमारे ३० विद्यार्थी सोमवारी माध्यान्ह भोजनात दिलेले अन्न खाल्ल्याने आजारी पडले.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजनानंतर ३० शाळकरी मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. भोजनात साप आढळला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मयुरेश्वर ब्लॉकमधील एका प्राथमिक शाळेतील सुमारे ३० विद्यार्थी सोमवारी माध्यान्ह भोजनात दिलेले अन्न खाल्ल्याने आजारी पडले. जेवण बनवणाऱ्या एका शाळेच्या कर्मचाऱ्याने मसूरडाळ असलेल्या एका डब्यात साप सापडल्याचा दावा केला. “मुलांना उलट्या होऊ लागल्याने आम्हाला त्यांना रामपूरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करावे लागले,’’ असे आधिकाऱ्यांनी सांगितले.
पालक संतप्त
पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाचा घेराव घातला आणि त्यांच्या दुचाकीची तोडफोड केल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. पालकांची समजूत काढल्यानंतर मुख्याध्यापकांची सुटका झाली.
अनेक तक्रारी
गटविकास अधिकारी दीपंजन जाना यांनी सांगितले की, माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर मुले आजारी पडत असल्याच्या अनेक ग्रामस्थांकडून तक्रारी आल्या आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एक वगळता सर्व मुलांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.