स्नॅपडीलची बेपत्ता कर्मचारी अखेर हरियाणात सापडली
By admin | Published: February 12, 2016 09:02 AM2016-02-12T09:02:39+5:302016-02-12T12:16:17+5:30
प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'ची बेपत्ता झालेली कर्मचारी दीप्ती सराना हिचा अखेर आज शोध लागला असून ती हरियाणामध्ये सुखरूप आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'ची बेपत्ता झालेली कर्मचारी दीप्ती सराना हिचा अखेर आज शोध लागला असून ती हरियाणामध्ये सुखरूप असल्याचे समजते. हरियाणातील पानिपत येथून तिने आपल्या कुटुंबियांना फोन करून आपण सुखरूप असल्याचे कळवले. दीप्ती बुधवार संध्याकाळापासून बेपत्ता होती, तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत होता.
मूळची गाझियाबादची रहिवासी असलेली दीप्ती स्नॅपडीलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. बुधवारी संध्याकाळी ६च्या सुमारास दीप्ती नेहमीप्रमाणे गुडगावहून गाझियाबादमधील निवासस्थानी जाण्यासाठी निघाली. रात्री ८ च्या सुमारास ती गाझियाबादमधल्या वैशाली मेट्रो स्टेशनवर उतरून शेअर रिक्षाने बस स्टँडच्या दिशेने निघाली होती. बस स्टँडवरून ती नेहमी तिच्या वडिलांसोबत घरी जात असे. मात्र बुधवारी रात्री ती घरी पोहोचलीच नाही.
बस स्टँडवर पोहचण्याआधीच रिक्षावाल्याने रिक्षातील एका मुलीला जबरदस्ती खाली उतरवले आणि दीप्तीला घेऊन पोबारा केला. रिक्षात असताना दीप्ती एका मित्रासोबत फोनवर बोलत होती, त्यानेच या घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना देत तिच्यासोबत काहीतरी विपरित घडल्याची शक्यता वर्तवली. दीप्तीच्या कुटुंबीयांनीही तिला अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. गाझियाबाद पोलिसांनी तिचं लोकेशन ट्रेस करुन दीप्ती आणि अज्ञात रिक्षावाल्याचा शोध सुरु केला असता अखेर आज सकाळी दीप्ती हरियाणात सापडली.