डरपोक पाकची माघार
By admin | Published: August 23, 2015 05:17 AM2015-08-23T05:17:47+5:302015-08-23T05:17:47+5:30
भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सोमवारी दिल्लीत ठरलेल्या बैठकीत कशावर चर्चा करायची, यावरून दोन्ही देशांमध्ये दिवसभर झालेल्या खडाजंगीनंतर
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सोमवारी दिल्लीत ठरलेल्या बैठकीत कशावर चर्चा करायची, यावरून दोन्ही देशांमध्ये दिवसभर झालेल्या खडाजंगीनंतर शनिवारी रात्री पाकिस्तानने या चर्चेतून अखेर माघार घेतली. सोमवारच्या बैठकीत फक्त दहशतवाद याच विषयावर चर्चा होईल आणि काश्मीरचा मुद्दा त्याच्याशी जोडून काश्मिरी फुटीरवाद्यांशी बोलणी करण्याची थेरं बिलकूल खपवून घेणार नाही, हे मान्य असेल तरच चर्चेसाठी या अन्यथा चर्चा होणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले व चर्चेला यायचे की नाही याचा निर्णय पाकिस्तानवर सोपविला. यासाठी भारताने दिलेली शनिवारच्या रात्रीची मुदत संपण्याची वाट न पाहता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रात्री उशिरा इस्लामाबाद येथे एक प्रसिद्धीपत्रक काढून आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज चर्चेसाठी भारतात जाणार नाहीत, असे जाहीर केले.
भारताने घेतलेल्या स्पष्ट व खंबीर भूमिकेने पाकिस्तानची मोठी कोंडी झाली. गेली दोन दशके आपल्या भूमीवरून ज्याच्याविरुद्ध दहशतवादाचे बीज पेरले, त्याच भारताच्या नजरेला नजर भिडवून दहशतवादावर चर्चा करण्याचे धार्ष्ट्य नसल्याने पाकिस्तान तोंड लपविण्यासाठी निमित्त शोधत असल्याचे चित्र शनिवारच्या घडामोडींवरून दिसले. राजनैतिक पातळीवर दिवसभर चाललेल्या कुरघोडी नाट्यात अखेर भारताने बाजी मारली व दहशतवादाच्या आडून छुपे युद्ध खेळणारे डरपोक पाकिस्तान चर्चेच्या टेबलावर बसून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यास तयार नाही, हे जगजाहीर झाले. नाही म्हणायला भारताने चर्चेसाठी पूर्वअटी लादल्या आणि अशी चर्चा करण्यात काही हाशिल नाही, हे तुणतुणे नकार देतानाही पाकिस्तानने सुरूच ठेवले.
दोन्ही देशांमध्ये दिवसभर खडाजंगी
बैठक घेऊन त्यात फक्त दहशतवादावर चर्चा करण्याचे उभय देशांच्या पंतप्रधानांनी रशियात उफा येथे झालेल्या भेटीत ठरविले आहे.
तसेच काश्मीर हा द्विपक्षीय विषय आहे व कोणाही त्रयस्थ पक्षाला मध्ये न आणता भारत व पाकिस्तान त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, हे ४५ वर्षांपूर्वीच्या सिमला करारात नमूद केलेले आहे.
सोमवारच्या बैठकीत दहशतवाद सोडून काश्मीरसह अन्य कोणताही मुद्दा आणण्याचा व पाकने काश्मिरी फुटीरवाद्यांशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हे मान्य असेल तर चर्चा होईल.
पाकिस्तानचे माहिती मंत्री परवेज रशीद यांनी स्वराज यांच्या पत्रकार परिषदेनंतर तेथील जिओ टीव्हीशी बोलताना म्हणाले, की सरताज अझीज यांची दिल्लीला जाण्यासाठी बॅग भरून बरोबर न्यायच्या सर्व फायली तयार करून व विमानाचे तिकीट काढून सर्व तयारी झाली आहे.
आता भारतानेच बैठक रद्द केली, नाहीतर आम्ही चर्चेसाठी जायला तयार आहोत! यजमानाने पाहुण्यांना अटी घालणे परंपरेला धरून नाही. भारताने आधी निमंत्रण दिले व आता तो अडथळे निर्माण करीत आहे.
डोवाल-मारिया भेट
पाकच्या हवाली करावयाच्या डॉसियरमध्ये भरभक्कम तपशील घालण्याच्या दृष्टीने मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांची दिल्लीत भेट घेतली. मुंबई पोलिसांची माहिती डॉसियरसाठी उपयुक्त ठरणारी आहे.
खापर फोडण्यासाठी चढाओढ
ठरलेली चर्चा रद्द होण्याचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची भारत व पाकिस्तान यांच्यात राजनैतिक पातळीवर चढाओढ सुरू होती. पण यात भारताचे पारडे स्पष्टपणे जड होते. मार्च १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोेटांपासून ते गुरदासपूर आणि उधमपूर येथील ताज्या हल्ल्यांपर्यंतच्या घडलेल्या दहशतवादी घटनांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने पुराव्यानिशी जगापुढे मांडले आहे. तरीही वर्षभर बंद पडलेला द्विपक्षीय संवाद पुन्हा सुरू करण्याचा मोठेपणा भारताने दाखविला. आता यातून अंग कसे काढून घ्यायचे, अशी पाकिस्तानची पंचाईत झाली आणि अखेर त्यांना माघार घ्यावी लागली.
स्वराज यांनी सिमला कराराचा हवाला देऊन केलेल्या वक्तव्यावर पाकचे माहितीमंत्री परवेज रशीद म्हणाले, की आम्ही चर्चा फक्त भारताशीच करणार आहोत. काश्मिरी नेत्यांना आम्ही फक्त स्वागत समारंभासाठी बोलावले आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानलाही त्यांना ज्याविषयी चिंता वाटते त्यावर कोणाशीही बोलण्याचा हक्क आहे.
नावेदला समोर उभे करू !
सोमवारच्या चर्चेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांची ‘डॉसियर’ त्यांना देण्याची जय्यत तयारी भारताने केली होती. त्यासंदर्भात अझीज म्हणाले होते, की आम्हीही भारताच्या ‘रॉ’ने पाकिस्तानमध्ये चालविलेल्या विघातक कारवायांची तीन ‘डॉसियर’ तयार ठेवली आहेत. दिल्लीतील भेट झाली नाही तर आम्ही ती न्यूयॉर्कमधील भेटीत भारताला देऊ व संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणिसांकडेही ती सुपुर्द करू. यावर विचारले असता सुषमा स्वराज म्हणाल्या, की ‘डॉसियर’ ही काही मीडियापुढे फडकावून दाखविण्याची किंवा कुठेही धावती भेट झाली तरी हाती सोपविण्याची गोष्ट नाही. ते अत्यंत गांभीर्याने सीलबंद स्वरूपात
द्यायचे दस्तावेज असतात. त्यांनी ‘डॉसियर’ दिली तर आम्ही उधमपूरमध्ये जिवंत पकडलेल्या नावेद या त्यांच्या दहशतवाद्यालाच त्यांच्यापुढे उभे करू !
फक्त दहशतवाद याच विषयावर चर्चा होईल आणि काश्मीरचा मुद्दा त्याच्याशी जोडून काश्मिरी फुटीरवाद्यांशी बोलणी करण्याची थेरं बिलकूल खपवून घेणार नाही, हे मान्य असेल तरच चर्चेसाठी या.
- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री
भारताने पूर्वअटी घातल्या नाहीत व काश्मीरचाही मुद्दा विषयपत्रिकेवर असेल तर आपण चर्चेसाठी जायला तयार आहोत.
- सरताज अझीज, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार