जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:14 PM2018-12-25T13:14:56+5:302018-12-25T13:15:54+5:30
स्नायपर हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचा सूचक इशारा
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून स्नायपर्सच्या सहाय्यानं भारतीय लष्कराला लक्ष्य केलं जात आहे. यावरुन आता भारतीय सैन्यानं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचं स्नायपर ऑपरेशन जवानांचं शीरकाण केल्यासारखं आहे. त्यामुळे लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. याचा बदला लवकरच घेतला जाईल, अशा शब्दांमध्ये लष्करानं यावर भाष्य केलं. शुक्रवारी पाकिस्तानी स्नायपर्सच्या हल्ल्यात लष्कराचे दोन जेसीओ शहीद झाले. काश्मीरच्या कुपवाड्यात ही घटना घडली.
एलओसीवर स्नायपिंग मोर्टार, लाईट आर्टिलरी आणि एँटी-टँक गायडेड मिसाईलच्या वापरामुळे दहशत निर्माण होते, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं. त्यामुळे आम्ही लवकरच आमच्या सहकाऱ्यांच्या हत्येचा बदल घेऊ, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. हा बदला कधी घ्यायचा आणि कुठे घ्यायचा हे भारतीय लष्कर ठरवेल, अशी माहिती दुसऱ्या लष्करी अधिकाऱ्यानं दिली.
भारतीय लष्कराकडे असलेल्या स्नायपर्स जुन्या आहेत. भारतीय जवान 7.62 एमएम ड्रॅगनोव सेमी-ऑटोमॅटिक स्नायपर राइफल्सचा वापर करतात. ही रायफल रशियन बनावटीची आहे. 1960 च्या दशकात या रायफलची निर्मिती करण्यात आली. या रायफलची मारक क्षमता 800 मीटर इतकी आहे. लष्कराकडून गेल्या अनेक वर्षांपासून 5719 8.6 एमएम स्नायपर रायफलची मागणी सुरू आहे. या रायफलची मारक क्षमता 1200 मीटर इतकी आहे.