...म्हणून २५ कोटी लाेक गरिबीतून आले बाहेर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 07:22 AM2024-01-19T07:22:45+5:302024-01-19T07:25:27+5:30
विकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनला आहे, ज्यामुळे कोणताही वंचित व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेली पारदर्शक व्यवस्था, तिचे प्रामाणिक प्रयत्न आणि लोकसहभागावर दिलेला भर यामुळे गेल्या ९ वर्षांत जवळपास २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधताना केले.
“भारतातील गरिबी कमी होऊ शकते याचा कोणीही विचार केला नसेल, परंतु गरिबांनी दाखवून दिले आहे की, त्यांना संसाधने दिली तर ते होऊ शकते, असेही ते म्हणाले. देशात गरिबीची संख्या २५ काेटींनी घटल्याचा नीती आयोगाने अहवाल नुकताच सादर केला हाेता. त्या अहवालाचा हवाला देऊन पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले की, भारताने गरिबांना मदत करण्यासाठी इतर देशांसमोर एक मॉडेल सादर करून जागाचे लक्ष वेधले आहे. हा अतिशय उत्साहवर्धक अहवाल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यावेळी म्हणाले.
‘विकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनला
विकास रथ’ हा ‘विश्वास रथ’ बनला आहे, ज्यामुळे कोणताही वंचित व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे मोदी म्हणाले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. लोकांचा आत्मविश्वास, सरकारवरील विश्वास आणि नवीन भारत घडवण्याचा संकल्प सर्वत्र दिसत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
यात्रेचे यश
यात्रेदरम्यान ४ कोटींहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
५० कोटींहून अधिक लोकांना ‘आयुष्मान’ कार्ड देण्यात आले. जवळपास ३५ लाख शेतकऱ्यांचा ‘पीएम किसान योजनेत समावेश करण्यात आला आहे.
गेल्या १० वर्षांत ४ कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले आहे आणि त्यातील ७० टक्के मालकी महिलांकडे आहेत. यामुळे त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.