... म्हणून चपातीवर 5 % अन् पराठ्यांवर 18 टक्के GST, खंडपीठाचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 16:46 IST2021-09-10T16:46:14+5:302021-09-10T16:46:59+5:30
गुजरातधील वाडीलाल कंपनीने पराठे आणि चपातींवर असलेल्या वेगवेगळ्या जीएसटी करप्रणालीवरुन न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर, ‘अग्रीम निवाडा प्राधिकरणा’च्या (एएआर) गुजरात खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

... म्हणून चपातीवर 5 % अन् पराठ्यांवर 18 टक्के GST, खंडपीठाचं स्पष्टीकरण
अहमदाबाद - देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होऊन अनेक वर्षे झाली. मात्र, कोणत्या वस्तूवर किती टक्के जीएसटी किंवा ही करप्रणाली समजावून घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेरचं काम आहे. त्यामुळे, हॉटेलमधील पदार्थांवर लावण्यात आलेल्या जीएसटीवरुन अनेकदा वादही झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा एकदा पराठ्यांवर लावण्यात आलेला जीएसटी चर्चेचा विषय ठरला आहे.
गुजरातधील वाडीलाल कंपनीने पराठे आणि चपातींवर असलेल्या वेगवेगळ्या जीएसटी करप्रणालीवरुन न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर, ‘अग्रीम निवाडा प्राधिकरणा’च्या (एएआर) गुजरात खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यानुसार, पराठ्यावर 18 टक्के तर चपातीवर 5 टक्के जीएसटी लागू राहिल, असे असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
वाडीलाल कंपनीकडून 8 प्रकराचे पराठे बनविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने गव्हाच्या पीठाचाच वापर करण्यात येतो. मिक्स्ड व्हेजीटेबल पराठ्यात 36 टक्के आणि मालाबार पराठ्यात 62 टक्के पीठाचा वापर केला जातो. तर, चपातीही पीठापासूनच बनविण्यात येते. तरीही, पराठ्यामध्ये 18 टक्के जीएसटी लागू होत असून चपातीला केवळ 5 टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे, पराठ्यांवरही 5 टक्के जीएसटी लागू व्हावा, अशी मागणी कंपनीने याचिकेत केली होती.
गुजरात एएआर खंडपीठाने कंपनीची याचिका फेटाळली आहे. चपाती ही पूर्णपणे पीठापासून बनविण्यात येते. त्यामध्ये, केवळ पीठ आणि पाणीच वापरले जाते. त्यामुळे, त्यावर कुठलाही टॅक्स लागू होत नाही. तर, पराठा हा तेलापासून बनतो. चपाती हे रेडी टू इट भोजन आहे, तर वाडीलाल कंपनीकडून बनविण्यात येणारे पराठे हे रेडी टू कूक आहेत. खाण्यापूर्वी त्यांना 3-4 मिनिटं तेलात भाजावे लागते. त्यामुळे, या पराठ्यांवर 18 टक्के जीएसटी लागतो, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, यापूर्वीही पापडाशी संबंधित इतर तळलेल्या प्रकारांवर १८ टक्के जीएसटी लागेल, असा निर्णय एएआर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेला आहे.
पापडावर 18 टक्के जीएसटी
गमतीशीर निरीक्षण नोंदवित गुजरात ‘एएआर’ने म्हटले होते की, पापड हे हाताने बनविले जातात. गोलाकार लाटणे सोपे जाते, म्हणून ते परंपरेने त्याच आकारात बनविले जातात. पण, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पापडांना वेगवेगळ्या आकारात आणले आहे. असे असले तरी जोपर्यंत उत्पादनातील घटक आणि प्रक्रिया याबाबतीत समानता आहे, तोपर्यंत पापड ‘एचएसएन १९०५९०४०’ या श्रेणीतच राहतील आणि या श्रेणीत जीएसटी दर शून्य आहे. ग्लोबल गृह उद्योग या संस्थेने पापडाची श्रेणी निश्चित करण्यासाठी एक याचिका एएआर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने हा निर्णय दिला. याचिकेत म्हटले होते की, पापड हा शिजविलेला पदार्थ नाही. ते ‘इन्स्टंट फूड’ही नाही. कारण खाण्याआधी त्याला तळणे किंवा भाजणे आवश्यक असते. याचिकाकर्त्यांचे हे म्हणणे खंडपीठाने मान्य केले.