...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 07:15 AM2024-05-25T07:15:37+5:302024-05-25T07:17:17+5:30
यासंदर्भात या संशोधन अहवालाच्या सह-संशोधक, नायजेरियातील इबादान विद्यापीठाच्या प्राध्यापिका इरुका ओकेके यांनी सांगितले की, “जगभरातील रुग्णांपर्यंत प्रभावी प्रतिजैविक औषधांचा सुलभ पुरवठा आवश्यक आहे. शास्वत विकासासाठी ही प्रतिजैविक औषधे सुलभपणे प्रदान करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : एका विश्लेषणानुसार, संसर्ग प्रतिबंधक उपायांमध्ये सुधारणा केल्यास, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रतिवर्षी अँटिमाइक्रोबियल रेझिस्टन्समुळे (एएमआर) होणारे सुमारे ७.५ लाख मृत्यू रोखले जाऊ शकतात, असे लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय चमूचा असा अंदाज आहे की, जगात दरवर्षी प्रत्येक आठपैकी एक मृत्यू हा जीवाणू संसर्गामुळे होतो, जगात एकूण ७.७ दशलक्ष मृत्यूपैकी ५ दशलक्ष जीवाणूंशी संबंधित आहेत.
यासंदर्भात या संशोधन अहवालाच्या सह-संशोधक, नायजेरियातील इबादान विद्यापीठाच्या प्राध्यापिका इरुका ओकेके यांनी सांगितले की, “जगभरातील रुग्णांपर्यंत प्रभावी प्रतिजैविक औषधांचा सुलभ पुरवठा आवश्यक आहे. शास्वत विकासासाठी ही प्रतिजैविक औषधे सुलभपणे प्रदान करणे आवश्यक आहे.
काय उपाय करायला हवे?
संसर्ग रोखण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय केल्यास खूप फरक पडू शकताे. या उपायांमध्ये हाताची स्वच्छता, आरोग्य सुविधांमधील उपकरणांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, तसेच पिण्याचे सुरक्षित पाणी, प्रभावी स्वच्छता आणि बालरोग लसींचा मुबलक पुरवठा यांचा समावेश आहे, असे संशोधन करणाऱ्या संशोधकांनी सांगितले आहे.
प्रभावी प्रतिजैविक औषधे आयुष्य वाढवतात, अपंगत्व कमी करतात, आरोग्य सेवा खर्च मर्यादित करतात. तसेच शस्त्रक्रिया सारख्या इतर जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय क्रिया सक्षम करतात, ओकेके म्हणाल्या.
आफ्रिकेतील कॉलराचे संकट गंभीर -
लिलांडा (झांबिया) : आफ्रिका खंडाच्या दक्षिण आणि पूर्व भागातील अनेक देशांमध्ये उष्ण कटिबंधीय वादळ, पूर आणि दुष्काळ यामुळे मोठ्या प्रमाणावर या देशांमध्ये उपासमार आणि विस्थापन झालेले आहे. तसेच आणखी एक प्राणघातक धोका या देशांचा माग सोडण्यास तयार नाही, ते म्हणजे कॉलरा रोगाची आलेली भयानक साथ.
- दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत, २०२१च्या उत्तरार्धात कॉलराच्या उद्रेकांची मालिका सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि जवळजवळ कॉलराची ३,५०,००० हून अधिक प्रकरणे या देशांमध्ये नोंदवली गेली आहेत.
- कॉलरा साथीच्या उद्रेकामध्ये मलावी, झांबिया, मोझांबिक, केनिया, इथिओपिया आणि सोमालियाचा समावेश आहे.