...म्हणून काश्मीरमध्ये ब्लॅक कॅट कमांडोंच्या तैनातीला लष्कराचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 12:14 PM2017-09-27T12:14:27+5:302017-09-27T12:52:12+5:30
काश्मीर खो-यात ब्लॅक कॅट युनिट म्हणजे एनएसजी कमांडोंच्या तैनातील लष्कराने विरोध केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
श्रीनगर - काश्मीर खो-यात ब्लॅक कॅट युनिट म्हणजे एनएसजी कमांडोंच्या तैनातील लष्कराने विरोध केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. काश्मीरमध्ये एनएसजी कमांडोंचा तळ उभारण्यात येणार असून, तिथे सुरक्षा पथकांना दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचे प्रशिक्षण देण्यात येईल. खासकरुन शहरी भागातील युद्धाचे प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने काश्मीर खो-यात एनएसजीचा तळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एनएसजीकडे प्रशिक्षणाची जबाबदारी असेल असे डीजीपी सुधीर प्रताप सिंह यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये एनएसजी कमांडो तैनात करायला लष्कर आणि अन्य सुरक्षा पथकांचा विरोध आहे. त्यामुळे सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रशिक्षणापुरती एनएसजीची भूमिका मर्यादीत राहील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिली आहे. सीआरपीएफच्या श्रीनगरजवळील लीथापोरा तळावर मागच्या महिन्याभरापासून एनएसजीचे 40 कमांडो तैनात आहेत. सीआरपीएफचा अजून कुठलाही प्रशिक्षण कार्यक्रम चालू झालेला नाही.
अपहरण, दहशतवादविरोधी कारवाई करणारे एनएसजीचे 51 स्पेशल अॅक्शन ग्रुपचे कमांडो दक्षिण काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत. काश्मीर खो-यात सक्रीय असणा-या सुरक्षा पथकांमध्ये एनएनसजी कमांडोंच्या उपयुक्ततेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. दहशतवादविरुद्ध लढाईत एनएसजी सर्वोत्तम फोर्स समजली जाते. पण 26 ऑगस्टला पुलवामा येथे जिल्हा पोलीस लाईनवर जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा एनएसजीला बोलावण्यात आले नव्हते.
त्यावेळी या दहशतवाद्यांशी झुंजणा-या एकही सुरक्षा पथकाला एनएसजी गरज भासली नाही. जिथे ही चकमक झाली त्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर एनएसजी कमांडो तैनात होते. काश्मीरमध्ये सैन्य सतत दहशतवाद्यांचा मुकाबला करत असते. पण एनएसजीला काही वर्षातून एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लढाईला सामोरे जावे लागते असे एका अधिका-याने सांगितले. अनेक पथके काश्मीर खो-यात सक्रीय आहेत. एनएसजीच्या प्रवेशामुळे गोंधळ आणखी वाढेल असे सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. एनएसजीने मागच्यावर्षी मानेसर येथील मुख्यालयात काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपला ट्रेन केले होते.