... म्हणून मोदी-शहांना भावले योगी आदित्यनाथ
By admin | Published: March 20, 2017 09:57 AM2017-03-20T09:57:00+5:302017-03-20T10:15:11+5:30
योगी आदित्यनाथ यांची झालेली निवड हा राजकीय विश्लेषकांपासून ते खुद्द भाजपामध्ये अनेकांसाठी अनपेक्षित धक्का आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 20 - उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची झालेली निवड हा राजकीय विश्लेषकांपासून ते खुद्द भाजपामध्ये अनेकांसाठी अनपेक्षित धक्का आहे. कारण संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपाच्या महत्वाच्या पोस्टर्सवर किंवा परिवर्तन व्हॅनवर कुठेही आदित्यनाथ यांचा फोटो नव्हता. हिंदुत्वापेक्षा विकासाच्या मुद्यावर सर्वाधिक भर देऊन भाजपाने ही निवडणूक लढवली.
त्यामुळे योगी आदित्यनाथ सारख्या आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या चेह-याला मुख्यमंत्रीपदी संधी मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचाराच्या एका टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर आपले महत्व सिद्ध करुन दाखवले. उत्तरप्रदेशात भाजपाने निवडणूक प्रचारात रोड शो वर भर दिला होता.
उत्तरप्रदेशमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य खासदार असलेल्या अलाहाबादमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी एक रोड शो केला. या रोड शो ला ब-यापैकी गर्दी जमली पण हा रोड शो तितका प्रभावी ठरला नाही. तेच सहाव्या टप्प्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 मार्चला अमित शहांनी गोरखपूरमध्ये रोड शो केला. त्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. आदित्यनाथ यांनी जणू संपूर्ण गोरखपूरचा रस्त्यावर उतरवले होते. या रोड शो मधील आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेने अमित शहा यांना 'इम्प्रेस' केले. जमलेली गर्दी योगी, योगीचा नारा देत होती. ही बाब भाजपा श्रेष्ठींनी ध्यानात घेतली.
योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या अजेंडयाच्या आड येईल असा आरोप विरोधकांकडून केला जायचा. यावर योगी समर्थक पंतप्रधान मोदींचे सुद्धा योगी आदित्यनाथांबद्दल अनुकूल मत होते हे पटवून देण्यासाठी काही उदहारणे देतात. मागच्यावर्षी जुलै महिन्यात महंत अवैद्यनाथ यांच्या पुतळच्या अनावरणासाठी पंतप्रधान मोदी गोरखनाथ मंदिरात आले होते. गोरखपूरमध्ये एम्स रुग्णालयासाठी पायाभरणी केली त्यावेळी सुद्धा मोदींनी जनसभेला संबोधित केले होते. त्यामुळे मोदींनी आदित्यनाथ यांच्याकडे दुर्लक्ष केले नव्हते.