म्हणून अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मिळाली क्लीन चिट, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 04:29 PM2023-06-15T16:29:53+5:302023-06-15T16:45:41+5:30
Brij bhushan sharan singh: अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.
अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पतियाळा कोर्टामध्ये ५५० पानांचा कॅन्सलेशन रिपोर्ट दाखल करून पॉक्सोअंतर्गत दाखल खटला हटवण्याची शिफारस केली आहे.
दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात ७ कुस्तीपटूंने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये दाखल केलेल्या दोन खटल्यांमध्ये गुरुवारी दोन कोर्टांमध्ये आरोपपत्र दाखल केलं. एक आरोपपत्र हे ६ महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीच्या खटल्यात रॉऊंज एव्हेन्यू कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरं आरोपपत्र हे पतियाळा कोर्टामध्ये एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या तक्रारीवरून खटला दाखल करण्यात आला होता. आता या अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या आरोपांच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी ५५० पानांच्या आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, पॉस्कोच्या तक्रारीबाबत कुठलाही पुरावा मिळालेला नाही. एवढंच नाही तर पॉस्कोचा तपास पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार पीडितेचे वडील आणि स्वत: पीडितेने दिलेल्या जबाबांच्या आधारावर पोलिसांनी कॅन्सलेशन रिपोर्ट दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी कोर्टामध्ये बृजभूषण सिंहविरोधातील पॉस्कोअंतर्गत दाखल केस हटवण्याची शिफारस केली आहे.
७ महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे बृजभूषण सिंहविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी बृजभूषण सिंहविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. पहिला गुन्हा सहा महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला होता. तर एक खटला हा अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पॉस्को कायद्यानुसार दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आपल्या जबाबामध्ये अल्पवयीन महिला कुस्तीपटूने बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र नंतर तिने आपला जबाब बदलला होता. तसेच कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर भेदभावाचा आरोप केला होता. तर दुसऱ्या जबाबामध्ये तिने लैंगिक शोषणाचा आरोप मागे घेताना आपली निवड न झाल्याने वैफल्यातून तक्रार केली होती, असा दावा केला.