...म्हणून लडाखमधील दु:साहसाची चीनला मोजावी लागेल मोठी किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:38 PM2020-06-27T23:38:27+5:302020-06-28T08:18:30+5:30
संरक्षण क्षेत्रातील जाणकारांचा इशारा; आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन एकाकी पडण्याची शक्यता
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारताविरुद्ध केलेल्या दु:साहसाची मोठी किंमत चीनला मोजावी लागेल. कारण या कृत्यामुळे चीन जागतिक पातळीवर एकटा पडणार आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय राजकारणातील जाणकारांनी दिला आहे. या कृत्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी चीनला कित्येक दशके लागतील, असेही जाणकारांनी म्हटले आहे.
जाणकारांनी म्हटले आहे की, मागील दोन महिन्यांपासून चीनने पूर्व लडाख आणि दक्षिण चीन परिसरात केलेल्या दु:साहसाची मोठी आर्थिक किंमत चीनला मोजावी लागणार आहे. संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत असताना चीनने या कारवाया केल्यामुळे चीनचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.
चीनचे अमेरिकेसोबतचे करयुद्ध, ऑस्ट्रेलियासोबत वाढत चाललेल्या व्यापारी कुरबुरी आणि हाँगकाँगमध्ये बिघडत चाललेली स्थिती याचा उल्लेखही जाणकारांनी केला आहे. चीनने गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर जो निर्घृण हल्ला केला आहे, त्यातून हेच दिसून येते की, चीनची जनमुक्ती सेना केवळ एक राजकीय दल आहे. त्याच्याकडे कोणतेही लष्करी मानके नाहीत. माजी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनल सब्रत साहा यांनी सांगितले की, आपल्या लष्करी आक्रमणामुळे चीन स्वत:च स्वत:ला एकटा पाडून घेत आहे. याची चीनला मोठी राजनैतिक आणि आर्थिक किंमत मोजावी लागेल. चीनच्या कारवाया आक्रमक आहेत. त्याची किंमत तर असेलच. चीन स्वत: एका कोपऱ्यात ढकलत आहे.
चीनचा खरा चेहरा आला समोर
माजी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांनी सांगितले की, पूर्व लडाखमध्ये आक्रमक लष्करी वर्तणुकीचे प्रदर्शन करून चीनने फार मोठी चूक केली आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना या कारवाया करून चीनने आपला खरा चेहराच जगासमोर आणला आहे, याची चीनला मोजावी लागणारी किंमत प्रचंड मोठी असेल.
इतरत्रच्या कारवायांबाबतही चिंता
माजी लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांनी म्हटले की, या दु:साहसाची लक्षणीय अशी आर्थिक किंमतही चीनला मोजावी लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जगात सध्या चीनच्या बाबतीत अनेक पातळ्यांवर चिंता व्यक्त होत आहे. हाँगकाँग, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्र, अशा अनेक ठिकाणी जे काही घडत आहे, त्याबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. साहा यांनी चीन-अमेरिका वादाचाही उल्लेख केला. ‘फाईट टू फिनिश’ संघर्ष, असे त्याचे वर्णन केले. आॅस्ट्रेलियासोबत चीनच्या वाढत्या व्यापारी कुरबुरींचा मुद्दाही साहा यांनी उपस्थित केला.