...तर दाऊद इब्राहिम भारतात येण्यास तयार
By admin | Published: November 8, 2016 03:16 AM2016-11-08T03:16:22+5:302016-11-08T03:16:22+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. आपणास मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात ठेवू नये, अशी अट त्याने पूर्वीही घातली होती
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. आपणास मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात ठेवू नये, अशी अट त्याने पूर्वीही घातली होती, असा दावा दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात दाऊदसोबत चर्चा करावी लागेल, असेही केसवानी यांनी सांगितले.
अॅड केसवानी म्हणाले की, आर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याची अट दाऊदने पाच वर्षांंपूर्वी सरकारसमोर ठेवली होती. मात्र, तत्कालीन सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते, असे सांगून अॅड केसवानी म्हणाले की, दाऊदच्या एका माणसाने माजी मंत्री व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांची लंडनमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी ही अट जेठमलानींसमोर ठेवण्यात आली होती.
दाऊदची अट अमान्य करणाऱ्या तेव्हाच्या तत्कालीन सरकारने अबू सालेम आणि छोटा राजनच्या अटी मान्य करत त्यांना भारतात आणले, असा गौप्यस्फोटही केसवानी यांनी केला. अबू सालेमने आपल्यावर फाशीच्या शिक्षेचा आरोप लावू नये, अशी अट घातली होती आणि छोटा राजनने आपणास तिहार जेलमध्ये न ठेवण्याची अट ठेवली होती. त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या सरकारने दाऊदच्या अटीकडे दुर्लक्ष केले, असा दावा केसवानी यांनी केला आहे.
केसवानी यांच्या म्हणण्यानुसार दाऊदची अट किरकोळ आहे. तरीही सरकार दाऊदला भारतात आणायला तयार नाही. यामागे दुसरेच काही कारण आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. दाऊदला सुरक्षिततेची हमी मिळाल्यास, तो भारतात येईल. याआधीही सुरक्षेच्या अटीवरच त्याने भारतात येण्यास सहमती दर्शवली होती, असेही केसवानी यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)