आतापर्यंत २२५ कोटी रुपयांची रोकड जप्त! आयकरचे छापे सुरूच; नोटांच्या २० बॅगा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:32 AM2023-12-10T10:32:47+5:302023-12-10T10:33:01+5:30
ओडिशातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरील छापेमारी आयकर विभागाने शनिवारीही सुरूच ठेवली असून बोलांगीर जिल्ह्यातील सुदापारा येथे नोटांनी भरलेल्या २० बॅगा जप्त केल्या आहेत.
भुवनेश्वर : ओडिशातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरील छापेमारी आयकर विभागाने शनिवारीही सुरूच ठेवली असून बोलांगीर जिल्ह्यातील सुदापारा येथे नोटांनी भरलेल्या २० बॅगा जप्त केल्या आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या छापेमारीत शुक्रवारपर्यंत सुमारे २२५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सुदापारा येथील एका देशी दारू उत्पादकाच्या घरातून नोटांनी भरलेल्या २० बॅगा जप्त करण्यात आल्या. यात एकूण ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे. नोटा मोजल्या जात आहेत.
आयकर विभागाचे महासंचालक संजय बहादूर यांनी मागील ३ दिवसांपासून ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे डेरा टाकला आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी शनिवारी सांगितले की, शुक्रवारी नोटांच्या १५६ बॅगा मोजण्यासाठी बोलांगीर येथील एसबीआयच्या शाखेत नेण्यात आल्या होत्या.
सूत्रांनी सांगितले की, पश्चिम ओडिशातील सर्वांत मोठा देशी दारू उत्पादक समूह बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीज आणि त्यांच्यासंबंधी अन्य संस्थांवर ही कारवाई केली जात आहे.
नोटा इतक्या की मोजणारी यंत्रे खराब...
१५० अधिकारी या छापेमारीत गुंतले आहेत. डिजिटल दस्तावेजांच्या पडताळणीसाठी हैदराबादेतील २० अन्य अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. संबलपूर आणि बोलांगीर येथील २ एसबीआय शाखांत नोटा मोजल्या जात आहेत. नोटा इतक्या आहेत की, मोजणारी यंत्रे खराब होत आहेत.