Bipin Rawat Funeral: ...म्हणून जनरल बिपिन रावत यांना १९ किंवा २१ नाही तर दिली जाणार १७ तोफांची सलामी, असा आहे इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 04:36 PM2021-12-10T16:36:47+5:302021-12-10T16:42:44+5:30
Bipin Rawat Funeral: देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत बिपिन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला ८०० जवान तैनात असतील. तसेच त्यांच्या पार्थिवाला १७ तोफांची सलामी दिली जाईल.
नवी दिल्ली - देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात (Bipin Rawat Helicopter Crash ) मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला ८०० जवान तैनात असतील. तसेच त्यांच्या पार्थिवाला १७ तोफांची सलामी दिली जाईल. सर्वसाधारणपणे भारतामध्ये २१ आणि १७ तोफांची सलामी दिली जाते. आता बिपिन रावत यांना १७ तोफांची सलामी का दिली जाईल, याबाबतचा इतिहास जाणून घेऊया.
भारतामध्ये तोफांची सलामी देण्याची परंपरा ही ब्रिटिश काळात सुरू झाली होती. त्या काळात ब्रिटिश सम्राटाला १०० तोफांची सलामी दिली जाई. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान आणि कॅनडासह जगातील सर्व देशांमध्ये राष्ट्रीय दिनी २१ तोफांची सलामी देण्याची परंपरा आहे. भारतामध्ये राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्याची परंपरा आहे.
तर १७ तोफांची सलामी ही हाय रँकचे लष्करी अधिकारी, नेव्हल ऑपरेशन्सचे प्रमुख आणि लष्कर आणि हवाई दलाच्या चिफ ऑफ स्टाफ यांना दिली जाते. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनाही १७ तोफांची सलामी दिली जाते. भारतात अनेक प्रसंगी राष्ट्रपती, सैनिकी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या अंत्यसंस्कारावेळी २१ तोफांची सलामी दिली जाते.
२१ तोफांची सलामी देण्याची प्रथा ही १४ शतकामध्ये सुरू झाली. त्या काळात जेव्हा कुठल्याही देशाचे सैन्य समुद्री मार्गामधून कुठल्याही देशामध्ये जात असे, तेव्हा किनाऱ्यावर ७ तोफा डागल्या जात असत. या माध्यमातून आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, असा संदेश दिला जाई. त्याकाळात पराभूत सैन्याला त्यांच्याकडील दारुगोळा संवण्याचे आदेश दिले जात. तसेच जहाजांवर सुद्धा ७ तोफा असत, कारण ७ आकडा हा शुभ मानला जात असे.