... म्हणून युवतीने अडवली पंजाबच्या परिवहनमंत्र्यांची गाडी, मंत्रीमहोदयांनी लावला फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 08:03 PM2022-01-01T20:03:57+5:302022-01-01T20:25:01+5:30
मंत्री राजा यांनी एमडी पीआरटीसी यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेऊन शक्य असल्यास तिला नोकरी देण्याचेही सूचवले.
चंढीगड - हरयाणातील एका मुलीने पंजाबचे परिवहनमंत्री अरमिंदर सिंह राजा यांची गाडीच अडवली. या मुलीने आपल्याकडे जड वाहतूक परवाना असून मला सरकारी बस चालवायची असल्याचे म्हटले. त्यावेळी, मंत्रीमहोदयांसह अनेकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला. मात्र, तिने आपला हट्ट सोडलाच नाही. त्यामुळे, मंत्री राजा यांनी पीआरटीसीच्या कार्यकारी संचालक (एमडी) यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेण्यास सांगितले.
मंत्री राजा यांनी एमडी पीआरटीसी यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेऊन शक्य असल्यास तिला नोकरी देण्याचेही सूचवले. जर एक महिला एमडी होऊ शकते, तर एक मुलगी बसही चालवू शकते. जर ही मुलगी बस चालवत असेल, तर पीआरटीसीचं नाव होईल, असेही मंत्रीमहोदयांनी म्हटले.
आईसोबत हरयाणात राहते
आपणास नोकरीची मागणी करणारी ही मुलगी हरियाणाची रहिवाशी असून तिला वडिल नाहीत. मुलीची आईही तिच्यासमवेत हरयाणामध्येच राहत आहे. या मुलीने जडवाहतूक परवाना काढला आहे. तिला अनेकांनी स्पोर्टसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने बस चालविण्याचाच हट्ट धरला आहे. त्यासाठी, गेल्या अनेक तासांपासून मंत्रीमहोदयांच्या गाडीची ती वाट पाहत होती.
सर्वकाही झेलण्याची ताकद
परिवहनमंत्री राजा वडिंग यांनी एमडीला फोन करुन संबंधित मुलीला शक्य असल्यास नोकरीवर घेण्याचं सूचवलं होतं. त्यावेळी, आजकाल वातावरण खराब असल्याचं एमडींनी मंत्र्यांना सांगितलं. मात्र, मुलीने कुठल्याही परिस्थितीशी सामना करायची तयारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, मंत्री राजा यांनी मुलीला एमडी मॅडमचा नंबर देऊन त्यांना कॉल करण्याचे सांगितले.