#BoycotHyundai : ... तर ह्युंदाईला भारतात बिझनेस करण्यास परवानगी देता येणार नाही, भाजप नेत्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:53 PM2022-02-07T13:53:00+5:302022-02-07T13:58:26+5:30
ह्युंदाई पाकिस्तान नावाने सुरू असलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामध्ये, चला काश्मिरी बंधुंचं बलिदान स्मरण करू आणि त्यांचे समर्थन करू.
नवी दिल्ली - दक्षिण कोरियातील कार उत्पादक कंपनी ह्युंदाई एका ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतात हुंडाई मोटर कार कंपनीच्याविरोधात सोशल मीडियावर ट्रेंड सुरू असून #BoycotHyundai अशा आशयाने कंपनीला ट्रोल करण्यात येत आहे. या वादानंतर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच, भारतीय राष्ट्रवादाचा आम्ही सन्मान करतो, दक्षिण कोरियानंतर भारत हे आमचं दुसरं घर असल्याचंही कंपनीने म्हटले आहे. मात्र, कंपनीचं हे स्टेटमेंट अधिक अपमानास्पद असल्याचं भाजप नेते कपिल मिश्रा यांनी म्हटलंय.
ह्युंदाईपाकिस्तान नावाने सुरू असलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामध्ये, चला काश्मिरी बंधुंचं बलिदान स्मरण करू आणि त्यांचे समर्थन करू. कारण, ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत राहतील. अशा आशयाची पोस्ट ह्युंदाई पाकिस्तान या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती. त्यासोबत, #HyundaiPakistan आणि #KashmirSolidarityDay हा हॅशटॅगही टाकण्यात आला होता. त्यानंतर, भारतीय नेटीझन्सने कंपनीला चांगलंच धारेवर धरलं. तसेच, बायकॉट ह्युंदाई हा ट्रेंडही ट्विटरवर सुरू झाला. त्यानंतर, कंपनीने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, अद्यापही माफी मागितली नाही किंवा ट्विटवरील ट्विट चुकीचं असल्याचं म्हटलं नाही. त्यामुळे, नेटीझन्सने पुन्हा राग व्यक्त केला आहे.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करुन कंपनीने याबाबत माफी मागण्याची मागणी केली आहे. कंपनीने दिलेलं स्पष्टीकरण हे अधिक अपमानास्पद आहे. दहशतवाद्यांना खुलेपणाने पाठिंबा दिल्यानंतर कंपनीला भारतात व्यवसाय करण्यासाठी परवानगी देता येणार नाही. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असे ट्विट कपिल मिश्रा यांनी केलं आहे. तसेच, कंपनीने माफी न मागितल्यास कंपनीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. तसेच, त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूलाही मोठा धक्का बसेल, असेही मिश्रा यांनी ट्विटरवरुन म्हटले.
This statement from @HyundaiIndia is further insulting
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 7, 2022
Hyundai cannot be allowed to run business in India after openly supporting terrorists
There should be an investigation against @Hyundai_Global for supporting and funding terror activities#BoycottHyundaihttps://t.co/1U8wzdWbpA
तसेच, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त अधिकारी केजेएस ढिल्लन यांनीही ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. आम्ही वीर सैनिकांचे आणि निशस्त्र असलेल्या नागरिकांचे बलिदान दिले आहे, ते आम्हा भारतीयांसाठी अधिक मौल्यवान आहे, असे ढिल्लन यांनी म्हटलंय.
ह्युंदाईचं स्पष्टीकरण
कंपनीने म्हटले- 'ह्युंदाई मोटर इंडिया 25 वर्षांहून अधिक काळ भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही राष्ट्रवादाच्या संदर्भात ठामपणे उभे आहोत. एका अवांछित सोशल मीडिया पोस्टमध्ये दाखवलेल्या Hyundai Motor India च्या लिंकमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारत हे Hyundai ब्रँडचे दुसरे घर आहे आणि असंवेदनशील संवादाबाबत आमचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे आणि आम्ही अशा कोणत्याही विचारांचा तीव्र निषेध करतो. भारताप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून आम्ही देशाच्या तसेच नागरिकांच्या भल्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू. आता पाकिस्तानातून पोस्ट झालेले ट्विट हे ह्युंदाईच्या अधिकृत हँडलवरून होते की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच ह्युंदाईने जे काही म्हटलेय ते देखील लोकांना रुचलेले नाही. लोकांनी ह्युंदाईला सपशेल माफी मागण्याची मागणी केली होती. परंतू ह्युंदाईने माफी न मागितल्याने भारतीय नेटकरी संतापलेले आहेत.