...म्हणून आता चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 03:42 PM2019-09-07T15:42:05+5:302019-09-07T15:47:23+5:30
देशात नवीन मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे.
नवी दिल्ली: देशात नवीन मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. त्यातच आता चप्पल अथवा सँडल घालून बाईक चालवणाऱ्यांवर देखील कारवाई होणार होणार असल्याचे समोर आले आहे.
ट्राफिक विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवणे धोकादायक असून ट्राफिक नियमांच्या विरोधातला हा खूप जुना नियम आहे. त्यामुळे नवीन कायद्यानुसार वाहतुक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करत असतानाच हा नियम देखील सक्तीने लागू करण्यात येणार असून आता गिअर असलेली बाईक चप्पल आणि सँडल घालून चालवल्यास कारवाई करत दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनाी स्पष्ट केले.
नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर १ सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत दहापट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे.
जर तुम्ही विना परवाना गाडी चालवित असाल तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याचसोबत दारुच्या नशेत गाडी चालविली तर 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर हे नियम मोडल्यामुळे तुमचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे.