Karunanidhi Death Update : म्हणून करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले होते स्टॅलिन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 07:59 PM2018-08-07T19:59:11+5:302018-08-08T06:12:22+5:30
Karunanidhi Death Update : करुणानिधी यांनी आपली दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्राला स्टॅलिन हे नाव ठेवण्यामागे एक विशिष्ट कारण होते.
तामिळनाडू - तब्बल पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज निधन झाले. तामिळनाडूच्या राजकारणावर प्रदीर्घ प्रभाव पाडणाऱ्या करुणानिधी यांनी आपले तिसरे पुत्र एम. के स्टॅलिन यांना आपला राजकीय वारस घोषित केले होते. करुणानिधी यांनी आपली दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्राला स्टॅलिन हे नाव ठेवण्यामागे एक विशिष्ट कारण होते.
ते कारण म्हणजे पन्नासच्या दशकात जागतिक राजकारणामध्ये रशियाचे राष्ट्रपती जोसेफ स्टॅलिन यांचा दबदबा होता. दुसऱ्या महायुद्धात निर्णायक नेतृत्व करणाऱ्यांपैकी स्टॅलिन हे एक होते. या स्टॅलिन यांचा मृत्यू 5 मार्च 1953 रोजी झाला होता. त्यापूर्वी पाच दिवस आधी 1 मार्च 1953 रोजी करुणानिधी यांना पुत्ररत्न झाले होते. जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरूनच करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव स्टॅलिन असे ठेवले.
करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. तसेच आपली बुद्धिमत्ता आणि वकृत्व कौशल्याच्या जोरावर ते लवकरच कुशल राजकारणी बनले. द्रविड आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. जस्टिस पार्टीचे के. अलगिरिस्वामी यांच्या एका भाषणावर प्रभावित होऊन करुणानिधी यांनी वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. तसेच तामिळनाडूत सुरू झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या भागातील तरुणांसाठी एका संघटनेची सुद्धा स्थापना केली होती.
प्रतिभावंत असलेल्या करुणानिधी यांचे तामिळ भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक पुस्तके, कादंबऱ्या, नाटके आणि अनेक तामिळ चित्रपटांचे संवाद लेखन केले होते. चित्रपट सृष्टीमधून राजकारणात उतरल्यानंतर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव स्वीकारला नव्हता. तामिळनाडूमधील त्यांचे समर्थक त्यांना कलाईनार अर्थात कलेचा विद्वान म्हणून संबोधत असत.