...म्हणून त्या काश्मिरी युवकाला जीपला बांधावे लागले - मेजर गोगोई
By admin | Published: May 23, 2017 06:06 PM2017-05-23T18:06:09+5:302017-05-23T18:58:56+5:30
काश्मिरी युवकाला जीपला बांधणारे मेजर नितीन गोगोई यांना लष्कराने सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयांवरुन वाद सुरु झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - काश्मिरी युवकाला जीपला बांधणारे मेजर नितीन गोगोई यांना लष्कराने सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयांवरुन वाद सुरू झाला आहे. काहींनी लष्कराच्या या निर्णयावर टीका केलेली असताना मेजर गोगोई यांनी स्वत:हून समोर येत या संपूर्ण घटनेची प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय आपल्याला का घ्यावा लागला ? त्यावेळी काय परिस्थिती होती त्याची गोगोई यांनी मंगळवारी संध्याकाळी विस्तृत माहिती दिली. "काश्मीरमध्ये निष्पक्ष निवडणूका पार पाडण्यासाठी शांतता राखण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मला मतदान केंद्रावर दगडफेक होत असल्याचे समजल्यानंतर मी तिथे गेलो. चार निवडणूक कर्मचारी आणि सात आयटीबीपीच्या जवानांची सुटका केली. आम्ही बाहेर आलो तेव्हा आमच्यावर सर्व बाजूंनी दगडफेक सुरु होती. दगडफेक करणारे आमच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकत होते. अशा परिस्थिती स्थानिक आणि निवडणूक कर्मचा-यांना वाचवण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय घ्यावा लागला," असे मेजर गोगोई यांनी सांगितले.
मेजर नितीन गोगोई यांना नुकतेच दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते. लष्कराने गोगोई यांच्यावर होत असलेल्या टीकेला झिडकारून लावत त्यांचा सन्मान केला आहे. एक सर्वसामान्य जवान ते आर्मी सर्व्हिस कॉपमध्ये मेजरच्या हुद्यापर्यंत पोहोचलेल्या गोगोई यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती. गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.