...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 06:23 AM2024-05-14T06:23:49+5:302024-05-14T06:24:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंगरमध्ये चपात्या बनवल्या आणि भाविकांना जेवण वाढून सेवाकार्य केले.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, मुझफ्फरपूर/हाजीपूर/सारण : इंडिया आघाडीचे नेते पाकिस्तानच्या अणुशक्तीबद्दल स्वप्नरंजन करत असून, ते त्या देशाला घाबरतात. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून, त्या देशाने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असे विधान फारूख अब्दुल्ला यांनी केले होते. जर पाकिस्तानने हातात बांगड्या भरल्या नसतील, तर त्या घालाव्यात, अशी परिस्थिती भारत त्या देशावर आणेल, अशी घणाघाती टीका टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.
बिहारमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले की, ‘पाकिस्तानकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा नाही, हे माहीत होते. मात्र, त्यांच्याकडे बांगड्यांचाही पुरेसा पुरवठा होत नाही, हे आम्हाला नुकतेच कळले.’ नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ मोदी यांनी त्यांचे नाव न घेता आपल्या भाषणात दिला व त्यांच्यावर टीकेची झोड उठविली.
डाव्यांनी अण्वस्त्रे नष्ट करण्याची मागणी केली हाेती : माेदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांमध्ये भेकड लोकांचा समावेश असून, त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला क्लीन चिट दिली आहे. या विरोधकांतील डावे पक्ष, तर भारताकडील अण्वस्त्रे नष्ट करण्याची मागणी करत आहेत. इंडिया आघाडी जर केंद्रात सत्तेत आली, तर पाच वर्षांत प्रत्येक पक्षाचा महत्त्वाचा नेता एक-एक वर्ष पंतप्रधान होईल. त्यामुळे केंद्रात राज्यकारभारात किती मोठा गोंधळ उडेल, याची लोकांनी कल्पना करावी, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
चपात्या बनविल्या, लंगरमध्ये जेवण वाढले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारची राजधानी पाटणा येथील तख्त श्री हरमंदिरजी पाटणा साहिब या गुरुद्वारात सोमवारी जाऊन दर्शन घेतले. तिथे त्यांनी लंगरमध्ये भाविकांना जेवण वाढून सेवाकार्य केले. या गुरुद्वाराच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या पंतप्रधानाने तिथे येऊन दर्शन घेतले व तिथे सेवाकार्य केले.