कितना भी मारो, हम डरेंगे नहीं, लढेंगे!
By admin | Published: April 25, 2016 04:29 AM2016-04-25T04:29:43+5:302016-04-25T04:31:00+5:30
अविनाश थोरात, पुणे- ‘तुम मुझे थप्पड मारो, ट्रेन में मारो, प्लेन में मारो, हॉल में मारो, कुछ भी करो, लेकिन हम बोलेंगे.
अविनाश थोरात, पुणे- ‘तुम मुझे थप्पड मारो, ट्रेन में मारो, प्लेन में मारो, हॉल में मारो, कुछ भी करो, लेकिन हम बोलेंगे. हमे डराने की कोशिश कीजा रही हैं, मगर हम डरेंगे नहीं, लढेंगे, असा विश्वास व्यक्त करीत देशाचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना पाठीशी असताना, नरेंद्र मोदी यांना आमच्या विचारधारेची भीती का वाटते, असा सवाल ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने केला.
पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने ‘रोहित अॅक्ट व संविधान परिषद’ रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रमुख वक्ता म्हणून कन्हैया कुमार बोलत होता. आजच्या लेनिनजयंतीचा उल्लेख आणि शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारेचा गौरव करून देशातील उच्च-नीच व्यवस्था आणि जातीअंताची लढाई करताना आत्मसन्मानाची चळवळ उभी करणार असल्याचे त्याने सांगितले. धर्मनिरपेक्ष आणि समतामूलक देश हेच आपले अंतिम ध्येय असून, त्यासाठी प्राणही देण्याची तयारी आहे, असे तो म्हणाला.
जातीयवाद, रूढीवादाच्या विरोधात लढणारे, मजुरांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांवर देशात हल्ले होत आहेत. देशात पदोपदी असमानता आहे. एकाच शाळेत काम करणाऱ्या दोन शिक्षकांना वेगवेगळे वेतन, पैसे असणाऱ्यांना बाटलीबंद पाणी आणि दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी बळी जात आहेत. ही कसली व्यवस्था आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान मतदानाचा हक्क दिला आहे, तर सुविधांचेही समान वाटप व्हायला हवे. आव्हान निर्मितीचे नाही, तर वितरणाचे आहे. खास वर्गाच्या लोकांना वेगळ्या सुविधा पुरविल्या जातात, असा आरोप त्याने केला.
‘लढाई हैद्राबाद विद्यापीठातून सुरू झाली आहे, ती जेएनयू, फर्ग्युसन मार्गे मोठे रूप धारण करीत आहे. लोकांना भडकावून निवडणुका जिंकणे हा आमचा धंदा नाही. जितके रोहित मारले जातील, तितके पुन्हा उभे राहतील,’ असे तो म्हणाला.
>पोलीस कोणाच्या सांगण्यावरून खोटे बोलताहेत?
रविवारी सकाळी विमानात घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना कन्हैया कुमार म्हणाला, ‘माझ्यावर विमानात झालेला हल्ला हा सीटच्या भांडणातून झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीटसाठी भांडण हे विमानात होत नाही, तर ते रेल्वेच्या जनरल डब्यात होते, लोकलमध्ये होते. मात्र, आमच्या लढाईला विरोध करण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत. पोलीस कोणाच्या सांगण्यावरून खोटे बोलत आहेत? जे लोक माझ्यावर हल्ला करीत आहेत, त्यांना भडकविण्यात आले आहे. मात्र, ते आपलेच आहेत. ते निश्चित चांगल्या मार्गावर येतील.’
किती खर्च करणार?
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ करण्यासाठी खर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त,
तसेच धारावी आणि दिल्लीतील झोपडपट्टीवासियांशी ‘मन की बात’ करावी, असा खोचक सल्ला कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींना दिला.
तुम्ही नाव बदला,
आम्ही समाज बदलू
देशात नावे बदलण्याचे राजकारण केंद्रातील भाजपा सरकार करीत आहे, तुम्ही नावे बदलत राहा आम्ही समाज बदलण्याचे काम करू, असा टोला कन्हैया कुमारने लगावला.
समतावादी आंबेडकर यांना नकोत
बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती सरकार साजरी करत आहे. मात्र, त्यांना समतावादी आंबेडकर आवडत नाहीत, अशी टीका करताना कन्हैया कुमार म्हणाला, ‘बाबासाहेबांनी जमिनींच्या समान वाटपाचा मुद्दा मांडला होता; कामगारांना न्याय हक्कांची मागणी केली होती; महिलांना संपत्तीचा अधिकार दिला होता, परंतु आताचे सरकार मुळातच महिलाविरोधी आहे.’
मान्यवरांची उपस्थिती
ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार जयदेव गायकवाड व जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आदी उपस्थित होते.
देशाचा झेंडा यांना बदलायचा आहे
कोणी काय खावे, काय परिधान करावे, अगदी लग्न कोणाशी करावे, हे सरकार ठरवू लागले आहे. मात्र, आमचे घटनात्मक अधिकार हिरावू देणार नाही. भारतमातेची प्रतिमाही यांनी बदलली. पूर्वीची भारतमातेची प्रतिमा ही कृषिमूलक हातात शेतीचे अवजार घेणारी होती. तिला यांनी वाघावर बसविले. एक दिवस ते देशाचा झेंडाही बदलतील. यांना राष्ट्रवादाशी काही घेणे-देणे नाही. यांच्या राष्ट्रवादामागे ब्राह्मणवाद दडलेला आहे. याचा धोका खूप मोठा आहे, अशा शब्दांत त्याने घणाघाती टीका केली.