तेव्हा नरेंद्र मोदीं म्हणाले होते बुलेट ट्रेन फक्त दिखाव्यासाठी, जुना व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 11:10 AM2017-10-01T11:10:19+5:302017-10-01T11:57:01+5:30
बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ दिखाव्यासाठी असेल, त्यातून लोक प्रवास करणार नाहीत पण त्यातून भारताची ताकद जगाला कळेल असे वक्तव्य केले होते.
मुंबई - बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ दिखाव्यासाठी असेल, त्यातून लोक प्रवास करणार नाहीत पण त्यातून भारताची ताकद जगाला कळेल असे वक्तव्य केले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2013 सालचा आहे. त्यावेळी गुजराते मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हा उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी बुलेट ट्रेनबाबतचे आपले मत व्यक्त केले होते. "आपण छोट्या छोट्या नेहमीच करत असतो, पण छोट्या गोष्टींमधून काही साध्य होणार नाही. त्यासाठी मोठे केले पाहिजे."असे मोदी म्हणाले होते.
मोदी पुढे म्हणतात,"मी एकदा पंतप्रधानांना भेटलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की संपूर्ण चीनची चर्चा कुठेच होत नाही. ते जगाला फक्त शांघाई दाखवतात. पूर्ण चीन कुठे दाखवतात., त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून मी पंतप्रधानांना सांगितले की अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन सुरू करा. या बुलेट ट्रेनमध्ये कुणी बसणार नाही. पण जगाला आपल्या गोष्टीचा अंदाज येईल. जगाला दाखवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात." दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ लागल्यापासून मोदींवर जोरदार टीका होत आहे.
नुकत्याच एल्फिन्स्टन रोड येथे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वसामान्यांमधून बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. तसेच मनसेसह अनेक राजकीय पक्षांनीही बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला आहे.
Is #BulletTrain for show off or a public amenity.. #Modi speech is clear pic.twitter.com/99HOMMJwKL
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 1, 2017