म्हणून 'या' गावातील लोकांचे होत नाही लग्न..!
By admin | Published: February 17, 2017 09:09 AM2017-02-17T09:09:28+5:302017-02-17T09:37:01+5:30
लखनऊजवळील गोसाइनपुरवा या गावात अद्याप वीजच पोहोचली नसल्याने तिथे कोणाचेच लग्न जमत नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 17 - नवनवे विक्रम स्थापित करत महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल उचलणा-या भारतात आजही अशी अनेक गावे आहेत जिथे अद्याप वीजही पोहोचलेली नाही. वीजटंचाईमुळे लोकांचे जीवन हलाखीचे झालेले असतानाच याच समस्येमुळे उत्तर प्रदेशमधील एका गावातील तरूणांचे लग्नच होत नसल्याचेही समोर आले आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ८-१० किलोमीटरवर असलेल्या 'बक्शी का तालाब' जवळील एका गावात अंधाराचेच साम्राज्य आहे. गोसाइनपुरवा असे त्या गावाचे नाव असून देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटल्यानंतरही गावात अद्याप वीज आलेली नाही आणि त्यामुळेच गावातील अनेक जण आजपर्यंत अविवाहीत आहेत.
गावातील अनेक वृद्धांच्या सांगण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत वीज काय असते हे पाहिलेलेच नाही. निवडणुका जवळ आल्या की अनेक नेते गावात येऊन विजेचे आश्वासन देतात, मात्र नंतर असे गायब होतात, ते थेट पुढच्या निवडणुकीलाच दिसतात. या पोकळ आश्वासनांमुळे गावकरीही वैतागले असून महिलांनी तर यावेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
या गावातील रहिवासी विनोद, आता त्याचे वय 37 वर्ष, वय उलटून जात आहे, पण अद्यापही त्याचे लग्न होऊ शकलेले नाही आणि त्याचे कारण म्हणजे 'नसलेली' वीज... जरी एखादं स्थळ आलं तरी गावात वीज नसल्याचे कळल्यावर ते लग्नाची पुढील बोलणी होत नाहीत.
याच गावातील रहिवासी 70 वर्षीय रामगोपाल यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत गावात प्रकाश पाहिलेलाच नाही. काही वर्षांपूर्वी गावात विजेच खांब लागल्यावर लोकांच्या आशा पल्लवित झाल्या ख-या, पण त्या खांबांवर विजेच्या तारा मात्र अद्यापही लागलेल्या नाहीत. काही लोकांचे शहरातही घरं आहे, त्यांची लग्न लगेच जमतात, पण अन्य गावकरी मात्र अजूनही अविवाहितच आहेत.