…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी

By बाळकृष्ण परब | Published: December 17, 2020 08:40 AM2020-12-17T08:40:13+5:302020-12-17T08:45:28+5:30

Farmer Protest : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, काल संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली आहे.

… So Sant Baba Ram Singh shot himself, the disciple told the story behind the incident | …म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी

…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी

Next
ठळक मुद्देबाबा राम सिंह यांचे शिष्य असलेले गुलाब सिंह यांनी आता बाबांच्या आत्महत्येमागचं कारण केलं स्पष्ट बाबा म्हणायचे की मला शेतकऱ्यांचे हे दु:ख पाहावत नाहीशेतकरी आंदोलनासाठी बाबा राम सिंह यांनी बलिदान दिले

चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र झालेले आहे. या आंदोलनादरम्यान, काल संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा बुड्ढा साहेबजी प्रचारक सभा, कर्नालचे सचिव आणि बाबा राम सिंह यांचे शिष्य असलेले गुलाब सिंह यांनी आता बाबांच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट केलं आहे.

गुलाब सिंह यांनी सांगितले की, मी १९९६ पासून बाबा राम सिंह यांचा शिष्य आहे. बाबाजींचा जन्म पंजाबमधील जगरांव येथे झाला होता. ते सहा बहिणींमधील एकुलते एक भाऊ होते. मी त्यांच्याकडून कीर्तन मिळवले होते. दरम्यान, सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी सध्या बाबांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले जात आहे.

गुलाब सिंह म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा भाई मनजित सिंह त्यांच्या शेजारी होते. ते बाबांचे राम सिंह यांचे हुजूरी सेवक आहेत. ते प्रत्येकवेळी बाबांसोबत असतात. ८ आणि ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी कर्नालमध्ये अरदास समागम आयोजित केला होता. त्यामध्ये अनेक जत्थे सहभागी झाले होते. ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी शेतकरी आंदोलनाला पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर बाबाजी तिथे उबदार चादरींचे वाटप करून आले होते. ते दररोज आंदोलनाच्या ठिकाणी जायचे. दररोज डायरी लिहायचे. म्हणायचे की मला हे दु:ख पाहावत नाही.


दरम्यान, बुधवारी बाबा राम सिंह पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले होते. तिथे त्यांनी आपल्या सेवादारांना स्टेजवर जाण्यास सांगितले. त्यादरम्यान, सर्वजण तिथून निघून गेले. बाबा राम सिंह गाडीत बसलेले होते. त्यानंतर त्यांनी एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी लिहिले की, शेतकरी आंदोलनामुळे दु:खी होऊन अनेक बांधवानी आपली नोकरी सोडली आहे. आपल्याला मिळालेले मान-सन्मान परत केले आहेत. अशा परिस्थिती मी माझे शरीर या आंदोलनाला समर्पित करत आहेत. त्यांच्याकडील पिस्तूल कारमध्ये पडलेले होते. तेच घेऊन त्यांनी स्वत:ला शहीद करून घेतले. शेतकरी आंदोलनासाठी त्यांनी बलिदान दिले.

बाबा राम सिंह यांच्या पार्थिवावर नानक सर, सिंगडा, कर्नाल येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन गुलाब सिंह यांनी केले आहे.

Web Title: … So Sant Baba Ram Singh shot himself, the disciple told the story behind the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.