तेव्हा सुरक्षारक्षकांनी कोविंद यांना राष्ट्रपती निवासाच्या दारातूनच धाडले होते माघारी
By admin | Published: June 20, 2017 06:14 PM2017-06-20T18:14:35+5:302017-06-20T19:15:50+5:30
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शक्याशक्यतांना पूर्णविराम देत भाजपाकडून राष्ट्रपतीपाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचे नाव काल जाहीर
Next
>ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 20 -अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शक्याशक्यतांना पूर्णविराम देत भाजपाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचे नाव काल जाहीर करण्यात आले होते. भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआकडे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव होत असल्याने कोविंद यांचे निवडून येणेही निश्चित मानले जात आहे. मात्र याच कोविंद यांना महिनाभरापूर्वी राष्ट्रपतींच्या अधिकृत आवासाच्या दारातून माघारी धाडण्यात आले होते.
गेल्या महिन्यात 30 मे रोजी कोविंद हे सिमला दौऱ्यावर गेले होते. तेव्हा भारताच्या राष्ट्रपतींचे तेथील अधिकृत निवासस्थान असलेल्या द रिट्रीट येथे ही घटना घडली होती. कोविंद यांच्याकडे राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून आवश्यक मंजुरीची कागदपत्रे नसल्याचे सांगत द रिट्रीटच्या सुरक्षा रक्षकांनी कुटुंबासहीत तेथे आलेल्या कोविद यांना माघारी धाडले होते. या संदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि आता भाजपाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनलेले कोविंद यांच्यात मैत्री आहे. बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहत असलेले कोविंद देवव्रत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिमला येथे गेले होते. दुसऱ्याच दिवशी कोविंद यांच्या लग्नाचाही वाढदिवस होता. त्यांना सिमला येथील पर्यटनस्थळांची माहिती नव्हती. तेव्हा हिमाचलच्या राज्यपालांचे सल्लागार शशिकांत शर्मा यांनी त्यांना द रिट्रीट येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या कोविंद यांना सुरक्षा रक्षकांनी नियमावर बोट ठेवत गेटवरूनच आल्या पावली माघारी घाडले होते. या घटनेबाबत शर्मा म्हणतात की आपण ज्या व्यक्तीला दरवाजावरून परतवले तीच व्यक्ती काही दिवसांनी येथे राष्ट्रपती म्हणून येण्याची शक्यता आहे, याची सुरक्षारक्षकांना तेव्हा कल्पनाही नव्हती. हिमाचलमधील मशोबरा येथे असलेल्या द रिट्रीटला भारताचे राष्ट्रपती वर्षातून एकदा जरूर भेट देतात.