...म्हणून शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत; पंतप्रधान माेदींनी 'दुखरी' नस छेडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:24 AM2023-08-10T06:24:42+5:302023-08-10T07:15:49+5:30
स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताच्या विकास यात्रेत मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान नितांत महत्त्वाचे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीला संबोधताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र मिळून लढावी. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जे पक्ष जोडले जातील, त्यांना जनतेच्या कल्याणासाठी एकत्र आणावे, असे आवाहन करत काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवार कधीच देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असे मत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते नवे महाराष्ट्र सदन येथे आयोजित केलेल्या भाजप रालोआ खासदारांच्या बैठकीत बोलत होते.
स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताच्या विकास यात्रेत मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान नितांत महत्त्वाचे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीला संबोधताना व्यक्त केले. या बैठकीला महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या खासदारांसह १३ मंत्री, ६१ खासदार उपस्थित होते.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, रामदास आठवले, डॉ. भारती पवार, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड या बैठकीत सामील झाले होते. याशिवाय शिवसेनेचे सर्व तेरा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हेही बैठकीला उपस्थित होते.
भाजप काँग्रेससारखा अहंकारी पक्ष नाही
भाजप काँग्रेससारखा अहंकारी पक्ष नाही. २०१४ ते २०१९ दरम्यान शिवसेना महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होता; पण ‘सामना’मधून आमच्या सरकारवर सतत बिनबुडाची टीका करून अनावश्यक वाद निर्माण केले गेले. तरीही आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही नव्हे तर शिवसेनेने आमची युती तोडली. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान