...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:23 PM2024-11-19T21:23:14+5:302024-11-19T21:23:35+5:30
Delhi News: मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे.
मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधीलप्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमधून शशी थरूर यांनी दिल्ली अजूनही देशाची राजधानी म्हणून राहण्यास लायक आहे का? असा प्रश्न विचारून त्यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. त्यावर अनेक युझर्सनी देशाची राजधानी ही दिल्लीहून चेन्नई किंवा हैदराबाद यासारख्या कुठल्या तरी शहरामध्ये स्थलांतरीत करण्याचा सल्ला दिला.
दिल्लीतीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, याआधी अनेक देशांनी आपल्या राजधान्या बदलल्या आहेत. इंडोनेशियाने २०२२ मध्ये पर्यावरणीय आव्हानं आणि वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी जकार्ता येथून नुसंतार येथे स्थलांतरीत करण्याचा कायदा पारित केला होता. इंडोनेशियासुद्धा जकार्तामधील प्रदूषणाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहे. आता जकार्तापासून सुमारे १ हजार किमी दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी देशाची नवी राजधानी उभारण्याचं काम सुरू आहे. तसेच २०४५ पर्यंत इंडोनेशियाची राजधानी ही जकार्ताहून नुसंतारा येथे पूर्णपणे स्थलांतरीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इंडोनेशियाच्या नव्या राजधानीच्या उभारणीसाठी राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २.९०५ लाख कोटी रुपये खर्च होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जकार्ता येथून नुसंतारा येथे १.९ दक्षलक्ष लोकांचं स्थलांतर करण्यात येण्याची अपेक्षा आहे. दिल्लीप्रमाणेच जकार्तासुद्धा दरवर्षी खराब होत असलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे त्रस्त आहे. जकार्तामध्ये सध्या एक कोटी नागरिकांचं वास्तव्य आहे. येथे मे ते ऑगस्ट महिन्यादरम्यान येथील हवेची गुणवत्ता खूपच खराब असते.